यजमान पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱया दिवशी 6 बाद 448 धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. मात्र यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 171 धावांवर खेळत असताना पाकिस्तानी कर्णधार शान मसूदने डाव घोषित करून त्याच्यावर अन्याय केला. द्विशतक हुकल्यामुळे मैदानाबाहेर जाताना रिझवानच्या चेहऱयावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती.
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानकडून कसोटीत दीडशेहून अधिक धावा करणारा पाचवा यष्टिरक्षक फलंदाज ठरला. मात्र, त्याला दुहेरी शतकाची संधी होती, मात्र कर्णधाराने डाव घोषित करून त्याला द्विशतकापासून वंचित ठेवले. रिझवानने 239 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 171 धावांची नाबाद खेळी सजविली. पाकिस्तानची आघाडीची फळी बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरल्यानंतर सऊद शकील (141) व मोहम्मद रिझवान (नाबाद 171) यांनी दणकेबाज शतके ठोकून पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 261 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली.