इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मुलतानमध्ये खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानचा अक्षरश: धुरळा उडवला आहे. पहिल्या डावात 556 धावा करूनही पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव झाला आहे.
मुलतानमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 556 धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांना भर दिवसा तारे दाखवले आणि 823 धावांचा डोंगर उभा केला. मात्र इंग्लंडने उभा केलेला डोंगर भेदून काढणं पाकिस्तानी फलंदाजांना काही जमलं नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानची धावसंख्या सहा विकेट्स गमावत 152 अशी होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी 220 धावांवर इंग्लंडने पाकिस्तानचा गाशा गुंडाळला. अशा पद्धतीने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी लाजीरवाना पराभव झाला.
विशेष म्हणजे पाकिस्तानने हा सलग सहावा कसोटी सामना गमावला आहे. या पराभवासोबत पाकिस्तानने एक लाजीरवाना विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही सामना हरणारी पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिली टीम ठरली आहे.