‘पाकिजा’मधील मीना कुमारींच्या डान्स सिक्वेन्ससाठी कारंजात टाकले होते गुलाबजल!

पाकिजा हा चित्रपट म्हणजे कमाल अमरोही यांचे सुंदर स्वप्न होते. हा चित्रपट तयार व्हायला तब्बल 16 वर्षे लागले होते. दीर्घ आजारपणातही मीना कुमारी यांनी हा चित्रपट पूर्ण केला होता. पाकिजा चित्रपटातील चलते चलते या गाण्याविषयीचा एक रंजक किस्सा महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या सेटवर सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कमाल अमरोही यांनी पाकिजामधील मीना कुमारींच्या डान्स सिक्वेंससाठी कारंजात चक्क गुलाबजल टाकले होते.

केबीसीच्या हॉटसीटवर स्पर्धक अफनीस नाज यांना विचारलेल्या प्रश्नात पाकिजा असा उल्लेख होता. त्यावरून बिग बी यांनी पाकिजा या चित्रपटाशी निगडीत आठवण सर्वांसोबत शेअर केली. ते म्हणाले, ताजमहालसमोर आहेत अगदी तसेच कारंजे सेटवर तयार केले होते. कमाल अमरोही यांनी या चित्रपटातील प्रत्येक दृश्य परफेक्ट हवे होते. म्हणून मीना कुमारी यांच्या डान्स सिक्वेन्ससाठी त्यांनी कारंजात गुलाब जलचा वापर केला होता. मेघनाद देसाई यांच्या पाकिजा या पुस्तकावरून या चित्रपटाची निर्मिती केली होती. मीना कुमारी यांनी केवळ एक रुपया एवढय़ा मानधनात पाकिजामध्ये काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या