हिंदुस्थानच्या घेरेबंदीमुळे पाकिस्तानची तंतरली, ‘टेन्शन’ कमी करण्यासाठी अमेरिकेचे पाय धरले

6568

लडाखमध्ये हिंदुस्थानने चीनला ज्या प्रकारे उत्तर दिले आणि जगभरातील देशांनी हिंदुस्थानला दिलेला पाठिंबा पाहून पाकिस्तानची तंतरली आहे. हिंदुस्थानची सैन्य ताकद पाहून गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता अमेरिकेचे पाय धरले आहेत. हिंदुस्थानसोबतचे टेन्शन कमी करण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी गळ पाकिस्तानने घातली.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव शोहेल महमूद यांनी अमेरिकेचे राजकीय प्रकरणाचे अवर सचिव डेविड हेले यांच्याशी बोलताना पुन्हा एकदा कश्मीर राग आळवला. तसेच हिंदुस्थानच्या वाढत्या सैन्य ताकदीवर चिंता व्यक्त करत पाकिस्तानला धोका असल्याचे म्हणत उर बडवून घेतला. मात्र हिंदुस्थानने याआधीच कश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप फेटाळला होता, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे ठणकावले आहे. यासह जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया बंद करत नाही आणि त्यांना संरक्षण देणे बंद करत नाही तोपर्यंत द्विपक्षीय चर्चा शक्य नाही असेही सांगितले आहे.

याबाबत पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, शोहेल महमूद यांनी दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी आणि कश्मीर वाद सोडवण्यासाठी पावलं उचलावी, अशी गळ अमेरिकेला घातली. गेल्या काही दिवसात जम्मू-कश्मीरमध्ये अनेक दहशतवादी आणि कमांडर यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीमेवरही पाकिस्तानच्या अगळीकीला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे.

हिंदुस्थान सीमांचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक हत्यारांची खरेदी आणि निर्मिती करत असल्याने पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. तसेच कश्मीर मुद्द्यावर तुर्की व्यतिरिक्त अन्य मुस्लिम राष्ट्र आणि सौदी अरेबियानेही साथ न दिल्याने पाकिस्तानने पुन्हा अमेरिकेकडे धाव घेतली आहे. याआधीही पाकिस्तानने अमेरिकेचे पाय धरले होते, मात्र हिंदुस्थानने थेट अमेरिकेला ‘हा द्विपक्षीय मुद्दा असून तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य आहे’, असे सुनावले होते. त्यामुळे यावेळीही पाकिस्तान तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या