पाकिस्तानची पुन्हा हिंदुस्थानवरच मदार, ‘कोविशिल्ड’च्या आपातकालीन वापराला मंजुरी, पण…

हिंदुस्थानमध्ये भारत बायोटेक निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ आणि ऑक्सफर्ड-सिरम निर्मित ‘कोविशिल्ड’ या दोन लसींना आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली असून लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. दुसरीकडे उठसूठ हिंदुस्थानवर आरोपांचे शिंतोडे उडवणारा पाकिस्तान आपल्याला ही लस मिळेल या आशेवर आहे. पाकिस्तानच्या औषध नियामक प्राधिकरणाने कोविशिल्ड या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली आहे. परंतु या लसीचे उत्पादन हिंदुस्थानमध्ये पुण्यातील सिरम इस्टीट्यूय ऑफ इंडिया करते आणि द्विपक्षीय करारानुसार पाकिस्तान ही लस थेट मिळवू शकत नाही.

पाकिस्तान अन्य कोणत्या मार्गाने ही लस मिळवता येईल याकडे लक्ष देत आहे. द्विपक्षीय करारानुसार पाकिस्तान ही लस थेट मिळवू शकत नसला तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने ही लस पाकिस्तानला मिळू शकते. यासह पाकिस्तान पुढील आठवड्यात चीनच्या सिनोफार्म निर्मित कोरोना लसीच्या वापरालाही मंजुरी देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोग्य विषयावरील विशेष सल्लागार डॉ. फैसल सुल्तान यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका निर्मित कोविशिल्ड लसीला वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस 90 टक्के परिणामकारक आहे. पाकिस्तानच्या नागरिकांसाठी ही लस मिळवण्यासाठी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करत आहोत. हिंदुस्थानकडून आयातीवर बंदी असल्याचे डॉ. फैसल यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की बंदी असताना जीव वाचवणाऱ्या औषधांची आयात केली जाऊ शकते.

तसेच ज्या देशात या लसीचे उत्पादन होत आहे ते आपल्या नागरिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करून देतील. मात्र तरीही आम्ही ही लस मिळवण्याचा प्रयत्न करू. तसेच चीनच्या सिनोफॉर्म निर्मित अन्य लसींचाही आम्ही विचार करत आहोत. आपली लोकसंख्या जास्त असल्याने अनेक देशांच्या परिणामकारक लसींची आयात केली जाईल, असेही डॉ. फैसल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या