पाकिस्तानी सैन्य आता शेती कारणार, सरकारने लष्कराला दिली 45 हजार एकर जमीन

हिंदुस्थानचा शेजारी पाकिस्तान सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे आर्थिक परिस्थिती बिकट होत असताना दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण जगात पाकिस्तानची बदनामी होत आहे. पाकिस्तानातील लोक अन्नासाठी तडफडत आहेत. पैशांसाठी पाकिस्तानला जगातील इतर देशांसमोर भीक मागावी लागत आहे. या सर्व संकटांच्या काळात हातात दारूगोळा ठेवत पाकिस्तानी लष्कराने शेती करण्याचे ठरवले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लष्कराला शेती करण्यासाठी 45 हजार एकर जमीन दिली आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्य ‘कॉर्पोरेट अ‍ॅग्रीकल्चर फार्मिंग’ करणार आहे. पाकिस्तानी लष्कराला यापूर्वी अनेकवेळा हिंदुस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी पाकिस्तानी लष्कराला शेती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प संयुक्त उपक्रमात असणार आहे. सशस्त्र दलातील सूत्रांनी सांगितले की, “प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लष्कर व्यवस्थापन स्तरावर भूमिका बजावेल. या जमिनीची मालकी संबंधित राज्य सरकारकडे राहील. लष्कराला कॉर्पोरेट कृषी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात कोणताही फायदा किंवा वाटा मिळणार नाही. अहवालात असे म्हटले आहे की पंजाब सरकारच्या भाकर, खुशाब आणि साहिवाल जिल्ह्यातील 45,267 एकर जमिनीवर कॉर्पोरेट कृषी शेती सुरू केली जाईल. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे.

यापूर्वी काराकोरम हायवेच्या बांधकामासाठी देखील पाकिस्तानी लष्कराची मदत घेण्यात आली होती. आता कृषी उत्पादन वाढविण्यासाठी पाकिस्तान आर्मी फार्मिंग केली जाणार आहे.