पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिघडली,अमेरिकेकडे मागणार मदतीची भीक

1075

एफएटीएफ अर्थात फायनान्शियल ऍक्शन टास्ट फोर्सने पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही पाकिस्तानवर प्रचंड दबाव आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिघडली असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेकडे आर्थिक मदतीची भीक मागणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये भरणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इम्रान खान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांची भेट घेणार आहेत. सध्या एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. भ्रष्टाचार रोखण्यातील अपयश आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत दिल्याचा पाकिस्तानवर ठपका ठेवण्यात आला. पाकिस्तानातील ही परिस्थिती ऑक्टोबरपर्यंत सुधारली नाही तर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती

आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वतीने पाकिस्तानसमोर काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या पहिल्या तिमाहीचा आर्थिक आढावा घेण्यात येणार आहे. पाकिस्तानवर असलेल्या 6 अब्ज डॉलर कर्जाच्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पाकिस्तान सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली असून जनतेवर कराचा बोजाही सरकारला टाकायचा नाही. अशा परिस्थितीत अमेरिकाच काय तो मार्ग दाखवू शकते, असेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी; विद्यार्थ्यांवर गुन्हे

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त कश्मीरमधील (पीओके)मुझफ्फराबादमध्ये रॅली काढून हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली होती. रॅलीवेळी भाषणबाजी करताना अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यात इम्रान खान यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी घोषणाबाजी केली होती. यामुळे संतापलेल्या इम्रान यांच्या सरकारने थेट विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या