Video – लग्नाचे वचन देत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, पाकिस्तानच्या कर्णधारावर महिलेचे गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. बाबर आझमने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. गेली दहा वर्ष त्याने मला लग्नाच्या आशेवर झुलवत ठेवले आहे. मी त्यातून गरोदर राहिलेले व त्याने माझा गर्भपातही घडवलेला, असा आरोप त्या महिलेने केले आहेत.

पत्रकार साज सादिकने शेअर केलेल्या एका व्हिडीओत ती महिला बाबर आझमवर गंभीर आरोप करत आहे. ‘बाबरचे क्रिकेटमधील करिअर घडायच्या आधीपासून मी त्याला ओळखते. तो एका गरिब कुटुंबातून आला आहे. मी आणि तो एकाच परिसरात राहायचो. आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. तो माझा शाळेतला मित्र होता. 2010 मध्ये त्याने मला प्रपोज केले होते. मी त्याचे प्रपोजल मान्य केले. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत फिरू लागलो.  त्याने मला लग्नाचे वचन दिले होते. त्यानुसार 2011 मध्ये आम्ही कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. त्यासाठी मी घरातून पळून आले. मात्र त्यानंतर त्याने मला एका भाड्याच्या खोलीत ठेवले. मी त्याला सतत लग्नाबाबत विचारायचे. मात्र तो टाळाटाळ करायचा’, असा आरोप त्या महिलेने केला आहे.

‘बाबरने गेल्या दहा वर्षांपासून असे तंगवत ठेवले आहे. यादरम्यान त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचारही केले. त्यातून 2016 ला मी गरोदर राहिले. त्यानंतर बाबरच्या वागणूकीत खूप बदल झाला. त्यानंतर त्याने माझा गर्भपातही केला. 2017 मध्ये मी बाबर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

बाबर आझम सध्या पाकिस्तान टीम सोबत न्य़ूझीलंडमध्ये आहे. या प्रकरणावर अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व बाबर आझमक़डून कोणतीही प्रतिक्रीया समोर आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या