कश्मीर, लडाख, सियाचीन आणि जुनागडवर पाकड्यांचा दावा

हिंदुस्थान आणि नेपाळ दरम्यान सुरु असलेल्या सीमावादाचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच पाकड्यांनी आता नेपाळच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पाकिस्ताने मंगळवारी आपल्या देशाचा नवा नकाशा जाहीर करीत हिंदुस्थानच्या लडाख, जम्मू कश्मीर येथील सियाचीन आणि गुजरातच्या जुनागडच्या काही भागांवर आपला दावा ठोकला आहे.

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारची मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर खान सरकारने हा नवा नकाशा जाहीर केला आहे. हा नकाशा जाहीर करताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हिंदुस्थानाने याठिकाणी बेकायदेशीररित्या ताबा मिळविल्याचा दावा यावेळी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने जाहीर केलेले हे नकाशे ते लवकरच संयुक्त राष्ट्रांसमोर सादर करणार असल्याचे कळते.

नेपाळच्या पावलांवर पाऊल
पाकडय़ांचा हा प्रताप म्हणजे नेपाळच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा लाजिरवाणा प्रयत्न असल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी नेपाळने देखील लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हा आपल्या देशातील भाग असल्याचा दावा केला होता. त्याकेळी नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनी आपला चीनबरोबर कोणत्याही प्रकारचा सीमा वाद नसल्याचे जाहीर केले होते. तर आपला सीमावाद हिंदुस्थानाबरोबर असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता.

जुनागडवरही ठोकला दावा
या अगोदर अनेकवेळा पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि लडाखवर आपला दावा ठोकला आहे. परंतु आता पाकिस्तानने गुजरातच्या जुनागडला देखील आपल्या नकाशात सामील करुन घेतले आहे. तर सध्या हिंदुस्थान आणि चीनच्या ज्या सीमाभागांवर विवाद सुरु आहे. तो भाग पाकिस्तान वरुन ’अनडिफाईंड फ्रंटियर’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या