सिद्धूच्या अडचणीत वाढ; पाकिस्तानकडून करतापूरबाबतच्या दाव्याचे खंडण

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट सिद्धू यांना महागात पडली आहे. या भेटीमुळे सिद्धू यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. शीख भाविकांना करतारपूर साहेब यांचे दर्शन घेता यावे यासाठी पाकिस्तान सीमेजवळ असलेली करतारपूर सीमा खुली करण्याबाबत बाजवा यांच्याशी चर्चा झाल्याचे सिद्धू यांनी पाकिस्तान दौऱ्यानंतर सांगितले होते. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या विधानाचे खंडण केले आहे. हे मोठे निर्णय एका क्षणात होत नसतात. त्यासाठी मोठी प्रक्रिया असते. तसेच दोन्ही देशांच्या चर्चेनंतरच याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने सिद्धू यांच्या दाव्याचे खंडण केल्यानंतर अकाली दलाने सिद्धू आणि काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

करतारपूरमध्ये गुरुनानक यांनी 18 वर्षे वास्तव्य केले होते. पाकिस्तानातील करतारपूरपासून हिंदुस्थानातील गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपर्यंत कॉरिडॉर बनवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अनेक वर्षांपासून तो रखडला आहे. शीख भाविकांच्या सोयीसाठी हा चार किलोमीटरचा कॉरिडॉर बनवण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधीदरम्यान बाजवा आपल्याजवळ आले आणि म्हणाले की शीख भाविकांसाठी करतारपूर सीमा खुली करण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्या आनंदात आणि भावनेच्या भरात आपण त्यांना मिठी मारल्याचे सिद्धू म्हणाले होते. पाकिस्तानने सिद्धू यांच्या विधानाचे खंडण केल्यानंतर अकाली दलाने त्यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

सिद्धू हे लोकप्रतिनिधी आहेत. तेथे बाजवा यांच्याशी त्यांची जी चर्चा झाली ,ती त्यांनी सांगितली. यात त्यांचे काय चुकले. ते लोकप्रतिनिधी आहे. ते यात खोटे बोलणार नाहीत. करतारपूर ही शिखांची पवित्र जागा असून यात राजकारण करू नये असे काँग्रेसने म्हटले आहे. सिद्धू यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी आणि काँग्रेस आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याबाबत उत्तर द्यावे अशी मागणी अकाली दलाने केली आहे.