पाकड्यांच्या कारवाया सुरूच; पूँछमध्ये गोळीबार, पाच ठार

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या पलिकडून रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पूँछ भागातील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात तीन मुलांसह पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.

मोहम्मद रमजान (४०), मालका बी (३८), फैजान (१३), रिझवान (९) आणि मेहरीन अशी मृतांची नावं आहेत. जम्मू कश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्यातही चार तारखेला राजौरी जिल्ह्यातील भिम्बर गली भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. यात हिंदुस्थानी सैन्याचे चार जवान शहीद झाले होते.