सध्याचे पाकिस्तानी फलंदाज डरपोक, इंझमाम इल हक भडकला

1156

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने सध्याच्या पाकिस्तानी फलंदाजांवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानी फलंदाज डरपोक असल्याची त्याने टीका केली आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने पहिला सामना जिंकला असून दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघावर मोठा दबाव निर्माण केला आहे. इंझमामने म्हटलंय की पाकिस्तानी फलंदाज हे त्यांचे फटके खेळण्यास घाबरत आहेत.

पाकिस्तानी फलंदाजांनी आक्रमक खेळ करण्याची गरज असल्याचं मत इंझमामने व्यक्त केलं आहे. इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात हरवायचं असेल तर आक्रमक खेळ करावाच लागेल असं त्याने म्हटलं आहे. इंझमामने म्हटलंय की पाकिस्तानी फलंदाज हे त्यांच्या बॅट पायाच्या मागे ठेवताना दिसत आहेत. त्यांनी बॅट ही दोन पायांच्या मध्ये ठेवायला हवी असं इंझमामचं म्हणणं आहे. फलंदाजांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याने ते स्लीपमध्ये झेलबाद होत असल्याचं निरीक्षण इंझमामने नोंदवलं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला होता तेव्हा 45.5 षटकांत 5 बाद 126 अशी धावसंख्या झाली होती. दुसऱ्या दिवशी 40.2 षटकांनंतर अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. तोपर्यंत पाकिस्तानची अवस्था 9 बाद 223 झाली होती. यातल्या 60 धावा एकट्या मोहम्मद रिझवानच्या होत्या.

इंग्लंडला मायदेशात हरवण्यासाठी आक्रमक खेळच दाखवायला हवा असं इंझमामने म्हटलं आहे. फलंदाजांना आणि संघ व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की त्यांनी आक्रमक खेळ दाखवावा ज्यामुळे इंग्लंडला पराभूत करता येईल नाहीतर दुसऱ्या सामन्यात पराभव टाळण्यासाठी पावसावर अवलंबून रहावं लागेल असं त्याचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या