पाकिस्तानची ‘नापाक’ हरकत, हिंदुस्थानी विमानाला घातला आकाशात तासभर घेराव

2203

हिंदुस्थानी सरकारने जम्मू-कश्मीरातील 370 कलम काढून टाकल्यावर पाकिस्तानी सरकारच नव्हे तर त्यांचे लष्करही सैरभैर झाले आहे. गेल्याच महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानी हवाईदलाच्या अनेक एफ -16 लढाऊ विमानांनी ‘स्पाईस जेट’ या हिंदुस्थानी कंपनीच्या विमानाला आकाशात सुमारे तासभर घेरून ठेवल्याची घटना उघडकीला आली आहे. सुमारे 120 प्रवासी घेऊन काबूलला निघालेल्या या विमानाची हवेतच झाडाझडती घेण्याच्या पाकड्यांच्या कृतीने वैमानिकासह प्रवासी पार हादरले होते. या धांदलीत थोडीशी चूकही शेकडो प्रवाशांचा प्राण धोक्यात आणू शकली असती अशी प्रतिक्रिया विमानाच्या वैमानिकाने दिली आहे.

23 सप्टेंबरला स्पाईस जेटचे एक प्रवाशी घेऊन दिल्लीहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलला निघाले होते. एसजी-21 क्रमांकाच्या उड्डाणाचे हे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत येताच त्याला पाकिस्तानी हवाईदलाच्या अनेक एफ-16 लढाऊ विमानांनी घेरले. सुमारे तासभर हवेत हे घेराव नाट्य सुरु होते. विशेष म्हणजे या काळात पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र अन्य देशांच्या प्रवासी विमानांसाठी बंद ठेवलेले नव्हते. पाकच्या लढाऊ विमानातील कॅप्टनने जेटच्या पायलटला विमान कमी उंचीवर का आणले असा सवाल करीत विमानाचा पूर्ण तपशील द्यायला बजावले. मात्र या नाट्यादरम्यान विमानातील 120 प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. कारण पाकिस्तानी हवाईदलाच्या हवाई चौकशीत जेटच्या पायलटची छोटीशीही चूक शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करू शकली असती. अखेर तासाभराने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हिंदुस्थानी प्रवासी विमानाला पुढे काबूलला जाण्याची परवानगी दिली आणि वैमानिकासह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

23 सप्टेंबरला पाकिस्तानी आकाशात घडलेल्या या घेराव नाट्यात पाकिस्तानची काही एफ -16 विमाने जेटच्या इतकी जवळ आली होती की पाकिस्तानी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेटमधील प्रवासी स्पष्टपणे पाहू शकत होते आणि पाकिस्तानी अधिकारीही या विमानातील प्रवाशांना पाहत होते. या नाट्यादरम्यान जेटच्या वैमानिकाने आपल्या विमानाचा आणि विमानातील प्रवाशांचा तपशील पाकिस्तानी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या