पाकिस्तानला आजही एअर स्ट्राइकची भीती

18

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थान पुन्हा कधीही एअर स्ट्राइक करेल याची भीती पाकिस्तानला आहे. म्हणूनच आपल्या सीमेलगत तैनात असलेली लढाऊ विमाने हिंदुस्थान जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आपण प्रवासी विमानांसाठी हवाई मार्ग खुला करणार नाही अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव शाहरुख नुसरत यांनी गुरुवारी येथील संसदीय समितीला ही माहिती दिल्याचे ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

शाहरुख नुसरत पुढे म्हणाले की, हिंदुस्थानी सरकारने हा हवाई मार्ग खुला करण्यास आम्हाला सांगितले, पण त्यावेळी आम्ही आमची अट त्यांच्यासमोर ठेवली आहे. हिंदुस्थानने त्यांच्या हवाई तळांवर अजूनही लढाऊ विमाने तैनात ठेवली आहेत. त्याबाबत आम्हाला चिंता आहे. ही विमाने जोपर्यंत हटवली जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमची हवाई हद्द खुली करणार नाही, असेही नुसरत यांनी समितीसमोर स्पष्ट केले. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्यामुळे हिंदुस्थानला दुसऱ्या मार्गावरून आपली विमाने न्यावी लागत आहेत. हिंदुस्थाननेही आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानी विमानांना जाण्यास मनाई कायम ठेवली आहे. त्यामुळे पाकिस्तानची मलेशिया आणि थायलंडमधून होणारी उड्डाण सेवा बंद ठेवावी लागली आहे.

मुंबई हल्ल्याशी संबंध नाही!

मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाफीज सईदने शुक्रवारी लाहोर उच्च न्यायालयापुढे आपण निष्पाप असल्याची उलटी बोंब मारली. हल्ल्याशी माझा काहीही संबंध नाही असा दावा त्याने याचिकेद्वारे केला. दहशतवादी कारवायांना पैसे पुरवल्याप्रकरणी सईदविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. यात मुंबई हल्ल्यातील सहभागाचाही आरोप आहे. या गुह्यांना सईद व त्याच्या साथीदारांनी लाहोर न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदुस्थानी यंत्रणांनी सईदला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हटले आहे, मात्र हा आरोप वास्तवाला धरून नाही असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या