…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती

820

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नेते आणि लष्करप्रमुखांनी युद्धाची पोकळ धमकीही दिली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कश्मीर राग आलापून कांगावा करत पाठिंबा मिळवण्याचा पाकड्यांचा प्रयत्नही फसला आहे. त्यामुळे पाकिस्तानची बेचैनी वाढली आहे. पाकिस्तानचे एका क्रिकेटपटूनेही आता अण्वस्त्रांचा वापर करण्याची दर्पोक्ती केली आहे. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, सर्फराज अहमद यांनी याआधी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने अण्वस्त्र वापराची दर्पोक्ती केली आहे.

कश्मीर मुद्द्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विधाने करताना जावेद मियांदादने मर्यादा ओलांडली आहे. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने बेभान विधाने केली आहेत. आमच्याकडे असलेली अण्वस्त्रे दिखाव्यासाठी नसून वापरण्यासाठी आहेत, असे मियांदाद म्हणाला आहे. पाकिस्तानमधील क्रीडा वेबसाइड खेलशेल डॉट कॉमच्या इंस्टाग्राम अकांउटवर जावेद मियांदादने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मियांदाद पत्रकारांशी कश्मीर मुद्द्यावर बोलत आहे. पाकिस्तान स्वसंरक्षणासाठी घातक शस्त्रास्त्रांचा वापर करत असेल तर त्यात अयोग्य काय आहे. स्वरक्षणासाठी आक्रमण हेच धोरण असल्याचे तो म्हणाला. पाकिस्तानकडे असलेली घातक शस्त्रास्त्रे वापरण्याची वेळ आल्याचेही त्याने म्हटले आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान डरपोक असल्याचेही मियांदाद बरळला आहे. आमच्याकडील अण्वस्त्रे दिखाव्यासाठी नसून वापरण्यासाठी आहेत.ही अण्वस्त्रे वापरून आम्ही शत्रूचा सफाया करू अशी दर्पोक्तीही त्याने केली आहे. जम्मू कश्मीरबाबत हिंदुस्थानने घेतलेल्या निर्णयामुळे बिथरलेल्या पाकिस्तानमधील नेते आणि क्रिकेटपटू आता बरळत आहेत. त्यातून त्यांचे भान सुटल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या