पाकिस्तान सरकार जीना विमानतळ गहाण ठेवणार; सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचेही वांदे

2449

पाकिस्तानची अर्थव्यवस्था पारच डबघाईला पोहोचली आहे. आपल्या कर्मचाऱयांना महिन्याचा पगार देणेही सरकारला आता कठीण होऊन बसले आहे. रोजचा व्यवहार चालविण्यासाठी इम्रान सरकार आता जीना विमानतळ देशातील तीन बँकांकडे गहाण ठेवून 452 कोटी डॉलर्स (जवळपास 70 हजार कोटी रुपये) जमविणार आहे.

जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पाकिस्तानातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विमानतळ आहे. एका आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात या विमानतळावरून 67 लाख प्रवाशांनी ये-जा केली होती. याच विमानतळाची तब्बल 1150 हेक्टर जमीन आता मिजान बँक, बँक ऑफ अलफलाह आणि दुबई इस्लामिक बँक या तीन बँकांकडे गहाण ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही नवाज शरीफ आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीतही तेव्हाच्या सरकारांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अन्य बाहेरील संस्थांकडे संपत्ती गहाण ठेवून कर्जे घेतली होती.

इम्रान सरकार सपशेल अपयशी – मलिक
देशातील सर्वात मोठे विमानतळ बँकांकडे गहाण ठेवण्याची वेळ येते म्हणजे इम्रान सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी गृहमंत्री आणि विद्यमान खासदार रेहमान मलिक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, जर नेत्याकडे व्हिजनच नसेल तर असेच होणार. आता महागाई कमी करणे आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हे आव्हान इम्रान खान यांच्यासमोर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या