पाकिस्तानने हाफिज सईद तुरुंगातून बाहेर काढले, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन बनले आहे. दहशतवाद्यांना तेथे पोसले जाते, हे पाकिस्तानने पुन्हा सिद्ध केले आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची पाकिस्तानने तुरुंगातून सुटका केल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. हाफीज सईद हा सध्या त्याच्या घरी असल्याचे समजते.

हाफीज सईद याला टेरर फंडिग प्रकरणी दोन वेळा तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या खटल्यात त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र त्या आधी सहा महिन्यांपासून त्याला लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात शिक्षा देण्यात आल्यानंतर या महिन्यात आणखी दोन टेरर फंडिग प्रकरणात त्याला 11 वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांनी हाफीजला देखील तुरुंगातून बाहेर काढून त्याला त्याच्या घरी ठेवले आहे असे समजते.

मुंबईवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात अद्याप शिक्षा नाही

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद आहे. सईदविरुद्ध अनेक पुरावे हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारला दिलेले आहेत. पाक सरकारने आजवर केवळ चौकशीचे नाटक केले. 26/11च्या गुन्ह्यात अद्याप हाफिज सईदला शिक्षा झालेली नाही.

अमेरिकेकडून 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम जाहीर

लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या असलेला हाफिज सईदला ‘ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून अमेरिकेने 2012 मध्ये जाहीर केले आहे. सईदची माहिती देणाऱयाला 10 दशलक्ष डॉलर्सचे इनामही अमेरिकेने जाहीर केले आहे. पाकिस्तानात मोकाट फिरणाऱया क्रूरकर्माचा पत्ता अद्याप पाक सरकारने अमेरिकेला दिलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या