हिंदुस्थान राफेलमुळे पाकिस्तान-चीनच्या एक पाऊल पुढे! हवाईदलप्रमुख भदौरिया यांचा विश्वास

469

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हवाई दल कालही सज्ज होते आणि आजही आहे. त्यात आता अत्याधुनिक राफेल विमानाची भर पडल्यामुळे हिंदुस्थान हा पाकिस्तान आणि चीनच्या एक पाऊल पुढेच राहील, असा विश्वास हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बोलून दाखवला. भदौरिया यांनी आज हवाई दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतरची परिस्थिती आणि एअर स्ट्राइकनंतर पुन्हा सुरू झालेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘हिंदुस्थानी हवाई दल हे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी कालही सज्ज होते आणि आजही आहे. आमच्या तयारीत कोणतीही कमतरता नाही. दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. योग्य वेळी आम्ही योग्य ती कारवाई करू.’ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीवर ते म्हणाले, ‘अण्वस्त्र हल्ल्याबाबत त्यांचे स्वतःचे विचार आहेत. आमचे स्वतःचे विचार आहेत. वेळ आलीच तर सगळय़ा आव्हानांना आम्ही पुरून उरू.’

आपली प्रतिक्रिया द्या