‘कपूर हवेली ’च्या सोनेरी आठवणी, शांता कपूर यांना द्यायचीय पेशावरच्या घराला भेट

पाकिस्तानच्या पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजारातील ‘ती’ चार मजली हवेली आजही शांता कपूर यांना आठवतेय. तीच हवेली जिथे त्यांचा जन्म झाला, तिथेच त्या बागडल्या, खेळल्या. त्यांच्या कित्येक उन्हाळी सुट्टय़ा त्या हवेलीत गेल्या. सारं शांता यांना आठवतंय. शांता कपूर म्हणजे दिवंगत अभिनेते पृथ्वीराज कपूर यांची छोटी बहीण. त्या 95 वर्षांच्या आहेत.

पाकिस्तान सरकारने राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घरांचे रुपांतर म्युझियममध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. हे समजताच शांता कपूर यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कमीत कमी आता तरी हवेली ठीकठाक राहील आणि लोक माझ्या वडिलांच्या-भावंडांच्या स्मृती जागवतील, असे शांता यांनी म्हटले आहे. त्यांना पेशावरच्या कपूर हवेलीला भेट द्यावीशी वाटते. तिथल्या छोटय़ा छोटय़ा जुन्या आठवणींत त्या रमतात. तिथले बालपण आठवून त्यांना हसू येतंय… खरंतर 90 वर्षे उलटून गेली आहेत, पण मला काही फरक पडत नाही. लाकडी जमीन, कडक थंडीत नळाचं गोठलेलं पाणी, त्या 60 खोल्या… सगळं आठवतंय, असं शांता कपूर सांगतात.

  • शांता कपूर या कपूर हवेलीत वास्तव्य केलेल्या कपूर फॅमिलीतील एकमेव हयात सदस्य आहेत. वयाच्या चौथ्या वर्षीच त्या भाऊ पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत कोलकाता येथे गेल्या. मात्र बालपणी सुट्टी घालवायला त्या पेशावरच्या हवेलीत यायच्या. 1941 साली ‘सिकंदर’ सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले पृथ्वीराज कपूर यांनी नंतर मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. शांता यांनी चंदर पी. धवन यांच्याशी विवाह केला. धवन यांचे 2015 साली निधन झाले. सध्या शांता या छोटय़ा मुलासोबत गुरुग्राम येथे राहतात.
आपली प्रतिक्रिया द्या