पुलवामा हल्ला ही इमरान खान सरकारची मोठी कामगिरी, पाक मंत्र्यांची कबूली

पाकड्यांनी कायम त्यांच्या देशात दहशतवादी अड्डे नसल्याचा कांगावा केला आहे. मात्र आता पाकिस्तानी मंत्र्यांनेच पुलवामा हल्ल्यात इमरान खान सरकारचा हात असल्याची कबूली दिली आहे. य़ा मंत्र्याने थेट संसदेतच याबाबत कबुली दिली असून ही इमरान खान सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचे त्या मंत्र्याने म्हटले आहे.

‘जनाम -ए- स्पीकर आम्ही हिंदुस्थानमध्ये घुसून मारले आहे. पुलवामा हल्ल्यात आपल्याला जे यश मिळाले आहे ते इमरान खान यांच्यामुळे सर्व जनतेला मिळालेले यश आहे. त्या यशाचे भागिदार तुम्ही व आम्ही सर्वच आहोत’, असे वक्तव्य पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. हिंदुस्थानी जवानांचे बळी घेण्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांसोबतच पाकिस्तानात सरकारचा देखील हात असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

इमरान खान यांनी देखील दिली होती धमकी

गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला करू अशी धमकी दिली होती. मात्र ही धमकी गळ्याशी येऊ शकते हे लक्षात येताच इम्रान खान यांनी सारवासारव करत पुलवामाशी पाकिस्तानचा संबंध नव्हता, असे सांगितले होते.

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या भयंकर हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश ए मोहम्मदचे अड्डे उडवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या