‘लाईव्ह शो’मध्ये राजकीय नेत्याने पत्रकाराला चोपले, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या एका नेत्याने न्यूज चॅनेलवरील लाईव्ह शोमध्ये एका पत्रकाराची धुलाई केली. पीटीआयचने नेते मसरूर अली सियाल यांनी कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष इम्तियाज खान फरन यांना लाईव्ह शो दरम्यान मारहाण केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मसरूर अली सियाल आणि इम्तियाज खान फरन ‘न्यूज लाइन विद आफताब मुघेरी’ या शोसाठी एकत्र आले होते. दोघांमध्ये एका मुद्द्यावरून शाब्दिक वादावादी झाली आणि हा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर आला. संतापाने लाल झालेल्या सियाल यांनी इम्तियाज यांना चांगलेच चोपले. यावेळी या कार्यक्रमासाठी आलेले आणखी दोन पाहुणेही उपस्थित होते.

सोशल मीडियावर टीका
पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर टीका केली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी हाच नवीन पाकिस्तान आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.