बुलडोझरने गेट तोडून पोलीस इम्रान खान यांच्या घरात घुसले, समर्थकांचीही धरपकड सुरु

तोशाखाना प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान शनिवारी सकाळी लाहोरहून इस्लामाबादला रवाना झाले. मात्र काही तासांनंतर पंजाब पोलिसांनी इम्रान यांच्या जमान पार्क येथील घरावर छापा टाकला. पोलिसांनी खान यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरील बॅरिकेड्स हटवले आणि बुलडोझर घेऊन थेट घराच्या आवारात प्रवेश केला. यावेळी घराजवळ तळ ठोकून बसलेल्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला पोलिसांना सामोरे जावे लागले. यावेळी पोलिसांनी इम्रानच्या समर्थकांवर लाठीमार केला आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या समर्थकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रानच्या घरी पक्षाने उभारलेल्या कार्यकर्त्यांच्या छावण्या हटवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. खान यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी सर्व समर्थकांना बाहेर निघण्याची विनंती केली. मात्र समर्थक ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी मुख्य गेट बुलडोझरने तोडून घरात प्रवेश केला आणि अनेक पीटीआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून खान यांच्या निवासस्थानातून थेट गोळीबार आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा दावाही केला.

दरम्यान इम्रान खान यांनी त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका केली. माझ्या विरोधात पोलिसांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी ट्विट केले की, ‘पंजाब पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर हल्ला केला. त्या घरात बुशरा बेगम एकट्या आहेत. पोलीस कोणत्या कायद्यानुसार हे करत आहेत? हा एका योजनेचा एक भाग आहे.