कट्टरपंथीय फैज अहमद नवीन आयएसआय प्रमुख, हिंदुस्थानसाठी टेन्शन?

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनलर फैज अहमद यांनी निवड करण्यात आली आहे. जनरल आसिम मुनीर यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे. जनरल फैज अहमद हे कट्टरपंथीय म्हणून ओळखले जातात आणि आयएसआयच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. रविवारी पाकिस्तानी सैन्याने पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.

जनरल आसिम मुनीर यांची आठ महिन्यांपूर्वी आयएसआयच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. आयएसआयच्या प्रमुखाला कालावधी हा 3 वर्षाचा असतो. परंतु तो पूर्ण होण्यापूर्वीच जनरल आसिम मुनीर यांना पदावरून हटवण्यात आले आणि जनरल फैज अहमद यांची निवड करण्यात आली. जनरल फैज अहमद यांनी यापूर्वी आयएसआयसोबत काम केलेले आहे.

हिंदुस्थानला टेन्शन?
पाकिस्तान पुरस्कृत पुलवामा हल्ला आणि त्याला हिंदुस्थानने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दिलेल्या प्रत्युत्तरानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला गेलेला आहे. अशातच आयएसआयच्या प्रमुखपदी कट्टरपंथीय जनरल फैज अहमद यांची निवड करण्यात आल्याने हिंदुस्थानपुढील आव्हानही वाढले आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर गेल्या 72 वर्षात निम्म्यापेक्षा अधिक काळ येथे लष्कराचे शासन राहिले आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर येथील सरकार चालवत असल्याचा आरोपही सातत्याने होतो.

पाकिस्तानमध्ये आयएसआय प्रमुखाचे पद ताकदवर मानले जाते आणि अशा पदावर एका कट्टरपंथीय व्यक्तीची निवड करण्यात आल्याने दोन्ही देशातील तणावात भर पडण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही आयएसआयने दहशतवाद्यांच्या दाढ्या कुरवाळण्यापासून ते हिंदुस्थानविरुद्ध युद्ध छेडण्याचे दहशती कृत्य केले आहे.