कलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

713

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे जम्मू कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पाकिस्तानकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन वगळता इतर कोणत्याही देशाने पाकिस्तानला मदत नाकारली आहे. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान तोंडघशी पडला. संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनवगळता कोणत्याही देशाने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाचाही पाठिंबा त्यांना मिळालेला नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. जम्मू कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून आमच्या अंतर्गत समस्येत कोणत्याही देशाने हस्तक्षेप करू नये, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रक जारी करत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे पुन्हा मदत मागितली आहे. जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंदुस्थानकडून जम्मू कश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावाही पाकिस्तान करत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी कश्मीरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. हिंदुस्थानशी चर्चा करायला पाकिस्तान तयार आहे. मात्र, द्विपक्षीय मुद्द्यांसह कश्मीरचा विषयावरही चर्चा व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान सरकार जम्मू कश्मीरला क्रूर वागणूक देत असून कश्मीरी नागरिकांवर अत्याचार होत असताना अशा वातावरणात हिंदुस्थानशी चर्चा शक्य नसल्याचा कांगावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या