पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला – गौतम गंभीर

3594

दानिश कनेरिया हा हिंदू क्रिकेटपटू पाकिस्तानी संघामधून अनेक वर्षे खेळला. त्याने स्वबळावर पाकिस्तानला विजय मिळवून दिल्यानंतरही संघ सहकाऱयांकडून त्याला चांगली वागणूक मिळत नव्हती. त्याच्यासोबत जेवणावरही आक्षेप असायचा, असा गौप्यस्फोट माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने गुरुवारी केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या या वाईट वर्तणुकीवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. हिंदुस्थानचा माजी खेळाडू गौतम गंभीर यानेही पाकिस्तानला टार्गेट करताना म्हटले की, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.

क्रिकेटपटूची ही अवस्था तर इतर अल्पसंख्याकांचे किती हाल होत असतील…

दानिश कनेरिया हा क्रिकेटपटू असून त्याला इतका त्रास झाला तर पाकिस्तानातील इतर अल्पसंख्याकांची अवस्था किती वाईट असेल याचा विचारही करू शकत नाही, असे गौतम गंभीर यावेळी म्हणाला.

‘मोहम्मद अझरुद्दीन यांच्याकडे हिंदुस्थानी संघाचे कर्णधारपद अनेक वर्षे होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे स्वतः खेळाडू होते. त्यांच्या देशात अशाप्रकारच्या घटना घडत असतील, तर ते लज्जास्पद आहे.’ – गौतम गंभीर

कैफ, पठाण, मुनाफचा आदर

हिंदुस्थानने मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल व इरफान पठाण या मुस्लिम क्रिकेटपटूंचा आदर केला. मुनाफ पटेल तर माझा जवळचा मित्र आहे. आम्ही सर्व हिंदुस्थानसाठी खेळताना एकजुटीने खेळत होतो. पाकिस्तानातील ही घटना मात्र दुर्दैवी आहे, अशी खंत गौतम गंभीरने पुढे व्यक्त केली.

हिंदू असल्यामुळे मला टार्गेट केले

शोएब अख्तरने केलेल्या वक्तव्यानंतर दानिश कनेरियाने शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, मी हिंदू असल्यामुळे मला टार्गेट केले गेले. माझ्या मागे काही खेळाडू टीका करायचे. पण धर्म बदलण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही, असे त्याने पुढे सांगितले. ज्या खेळाडूंनी मला टार्गेट केले त्यांच्या नावांची घोषणा मी लवकरच करीन, असेही दानिश कनेरिया यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या