पाकिस्तान दहशतवाद पोसणारे राष्ट्र ठरवा, अमेरिकेच्या संसदेत विधेयक

14
फोटो-ANI

सामना ऑनलाईन । वॉशिंगटन
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचं दिसून येत असून अमेरिकन संसदेचे दहशतवाद संबंधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी संसदेत गुरुवारी ‘पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररीजम अॅक्ट’ हे विधेयक मांडलं आहे. यात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी पुरवणारे राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. तसंच अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंधांवर पूर्नविचार करण्याची मागणीही केली आहे.
संसदेत मागणी करताना पो म्हणाले की, ‘पाकिस्तानवर विश्वास दाखवणं योग्य नाही, अनेक वर्षांपासून पाकिस्तानींनी अमेरिकेच्या शत्रूंना थारा दिला आहे. ओसामा बिन लादेन आणि हक्कानी नेटवर्कसोबत पाकिस्तानचा जवळचा संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की, दहशवादी कारवाई दरम्यान पाकिस्तान कोणाची बाजू घेतात’.
पो असेही म्हणाले की, पाकिस्तानला अमेरिकेकडून होणारी मदत थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच ९० दिवसांत पाकिस्तानने दहशवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर काय मदत केली आहे याचा अहवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्यावा, असंही म्हटलं आहे. जर या अहवालात पाकिस्तान दोषी आढळले तर त्यांवर पुढील ३० दिवसात कारवाई करताना पाकिस्तानचा उल्लेख ‘दहशतवादाचे प्रायोजक राष्ट्र’ असा करण्यात यावा असंही सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी या आधीही करण्यात आली आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना याच विषयावर ऑनलाईन मोहीम देखील राबवण्यात आली होती. मात्र ओबामा सरकारनं ही मागणी धुडकावून लावली होती. मात्र आता पाकिस्तानला दहशतवादाचे प्रायोजक राष्ट्र असे न ठरवल्यास त्याची कारणं द्यावी लागणार आहेत, असं या विधेयकात म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी अमेरिका खासदारानं केल्यानं काय कारवाई होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या