Pakistan Cricketer Yasir Shah – 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कारप्रकरणी यासिर शाहला पोलिसांनी निर्दोष घोषित केलं

पाकिस्तानी क्रिकेटपटू यासिर शाह याच्याविरूद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील शालिमार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासिर शाह याचंही आरोपींमध्ये नाव असल्याने पाकिस्तानी क्रिकेटजग हादरलं होतं. तक्रार दाखल केल्यानंतर यासिर शाह याने आपल्याशी संपर्क साधून, एक फ्लॅट विकत घेऊन देण्याचे आणि पुढील 18 वर्ष देखभालीसाठी लागणारा सगळा खर्च उचलण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं असा आरोपही तक्रारदार मुलीने केला होता.

या प्रकरणी शालिमार पोलिसांनी एक पुरवणी अहवाल तयार केला असून यामध्ये यासिर शाह याने कोणताही गुन्हा केला नसून तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तक्रारदार मुलीने आपला जबाब फिरवल्याने यासिरचं नाव आरोपींच्या नावातून वगळण्यात आलं असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. यासिरचा मित्र फरहान याने बंदुकीचा धाक दाखवत आपल्यावर बलात्कार केला होता असं मुलीने तक्रारीत म्हटलं होतं. ‘याबाबत मी यासिरला व्हॉटसअपद्वारे कळवलं तेव्हा त्याने मला लहान मुली आवडतात असं म्हणत माझी खिल्ली उडवली’ असं तक्रारदार मुलीने गुन्हा दाखल करतेवेळी म्हटलं होतं. यासिर आणि फरहान हे लहान मुलींवर बलात्कार करून त्यांचे व्हिडीओ बनवत असल्याचा खळबळजनक आरोपही तिने केला होता. आपली वरपर्यंत ओळख असल्याने सांगत यासिरने आपल्याला धमकावलं होतं असा आरोपही तिने केला होता. अशा या गंभीर प्रकरणातून यासिर शाह याला पोलिसांनी निर्दोष घोषित केलं आहे.