पाच राफेल घ्या नाहीतर पन्नास, हम तैय्यार है, बिथरलेल्या पाकिस्तानची हिंदुस्थानला धमकी

1104

हिंदुस्थानात अत्याधुनिक राफेल विमाने दाखल झाल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. आज पाकिस्तानने आपल्या स्वातंत्र्यदिनी हिंदुस्थानला धमकी दिली. ‘हिंदुस्थान पाच राफेल खरेदी करो का पन्नास, आम्ही पूर्णपणे तयार आहोत’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रकक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी केली. हिंदुस्थानात राफेल आल्यानंतर पाकिस्तानकडून व्यक्त झालेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

जगात लष्करावर सर्वाधिक खर्च हिंदुस्थानात होतो. शस्त्रास्त्रांची स्पर्धा लावली आहे असा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते इफ्तिखार यांनी केला. हिंदुस्थान स्वत:ला असुरक्षित समजत असल्यानेच फ्रान्सपासून हिंदुस्थानपर्यंतच्या राफेलच्या प्रवासाला प्रसिध्दी दिली गेली असे ते म्हणाले. राफेलमुळे काही विशेष फरक पडणार नसून पाकिस्तानला आपल्या लष्करी क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले. राफेलच नव्हे तर हिंदुस्थानच्या एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमचाही सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत असे ते म्हणाले.

हिंदुस्थानचा लष्करावर होणारा खर्च हा पाकिस्तानपेक्षा जास्त असल्याने आशिया खंडात असंतुलन निर्माण झाले आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले पाहिजे असे इफ्तिखार म्हणाले. कश्मीरमध्ये विशिष्ट धर्माची लोकसंख्या वाढवण्याचा हिंदुस्थानचा कट असून हिंदुस्थान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या