दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवा, अन्यथा आर्थिक नाकेबंदी! ‘एफएटीएफ’चा पाकिस्तानला गंभीर इशारा

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारी आर्थिक रसद रोखण्यात पाकिस्तान नाकाम ठरले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणे वेळीच थांबविण्यात यावे. पुढच्या चार महिन्यांत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भातील धोरणात बदल न झाल्यास आर्थिक नाकेबंदी करून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशारा आर्थिक कारकाई कृती दलाने (एफएटीएफ) दिला आहे.

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजेच ‘एफएटीएफ’ ही  आंतरराष्ट्रीय संस्था जगभरातील ‘मनी लाँडरिंग’ची प्रकरणे आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍यांकर बारीक लक्ष ठेवण्याच काम करते. जून 2018मध्ये या संस्थेने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते. या यादीतून बाहेर येण्यासाठी पाकला काही निकषांची पूर्तता करणे गरजेचे होते. त्यानंतरही दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमधून होणारा अर्थपुरवठा सुरूच आहे. हे लक्षात घेता ‘एफएटीएफ’ने पुन्हा एकदा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आर्थिक स्ट्राइकसाठी वाढता दबाव

हिंदुस्थानच्या सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘एअर स्ट्राइक’ने सैरभैर झालेल्या पाकिस्तानवर ‘आर्थिक स्ट्राइक’ करण्यासाठी जग सज्ज झाले आहे. फ्लोरिडामध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानला ऑक्टोबरची ‘डेडलाइन’ देण्यात आली आहे.  हिंदुस्थानच्या याबाबतच्या प्रस्ताकाला अमेरिका आणि ब्रिटनने समर्थन दिले आहे तर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यास तुर्कस्तानने विरोध केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान उघडा

दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे थांबवावे यासाठी पाकिस्तानला वारंवार संधी देण्यात आली. त्यानंतरही इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-तोयबा, जैश, जेयूडी, एफआयएफ या दहशतवादी संघटनांना होणारा अर्थपुरवठा थांबावावा यासाठी पाकिस्तान सरकारने ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. त्यावर ‘एफएटीएफ’ च्या अहवालात नाराजी व्यक्त करण्यात आली.

दहशतवाद रोखण्यासाठी ठोस पावले उचला

‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला आतापर्यंत ‘ग्रे लिस्ट’ मध्ये ठेवले आहे. या लिस्टमध्ये असणार्‍या देशाला आर्थिक मदत देणे किंवा कर्ज देणे जोखमीचे समजले जाते. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानला अर्थपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थानीही आखडता हात घेतला आहे. दरम्यान ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दिलेल्या निर्वाणीच्या इशार्‍याबाबत बोलताना हिंदुस्थानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आता तरी दहशतवाद रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.