हिंदुस्थानशी चर्चेची वेळ निघून गेली, बिथरलेल्या इम्रान खान यांची हताश प्रतिक्रिया

1247

हिंदुस्थान ऐकत नसल्याने तसेच चीनवगळता जगातील इतर देशांनी पाठ फिरवल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच बिथरले आहेत. हिंदुस्थानशी चर्चेची वेळ आता निघून गेलीय, किंबहुना चर्चा करण्याची इच्छाच उरलेली नाही, अशी हताश प्रतिक्रिया इम्रान यांनी गुरुवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान दिली. जम्मू-कश्मीरच्या निर्णयामुळे झालेला तीळपापड त्यांनी या मुलाखतीतूनही दाखवून दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर इम्रान यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला मुलाखत दिली. या वेळी त्यांनी हिंदुस्थानबरोबरच्या संबंधावर बेताल बरळण्याची संधी सोडली नाही. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाची खदखद व्यक्त करताना इम्रान यांनी आता हिंदुस्थानबरोबर चर्चा करण्यासारखे काहीच उरलेले नाही, अशी हताश प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला मुलाखत दिली. हिंदुस्थानसोबत चर्चेसाठी सर्व काही केले. जेव्हा मी शांतता आणि चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत होतो तेव्हा हिंदुस्थानने आमच्याकडे तुच्छतेने पाहिले. नरेंद्र मोदींनी चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला. आता चर्चेचा प्रश्नच उरलेला नाही, अशी आगपाखड इम्रान यांनी केली.

अणुयुद्धाची धमकी
दोन अण्वस्त्र देश समोरासमोर आले तर काहीही घडू शकते, अशा शब्दांत इम्रान यांनी अणुयुद्धाची अप्रत्यक्ष धमकीही हिंदुस्थानला दिली. दोन अण्वस्त्र संपन्न देशांतील ही तणावाची स्थिती जगासाठी चांगली नाही, अशी बकबक त्यांनी केली. कश्मीरमध्ये राहणाऱया जवळपास 80 लाख लोकांचे जीवन धोक्यात आहे. हिंदुस्थान सरकार कश्मीरमधील एक पूर्ण समुदाय संपवायला निघालेय, असा पोकळ दावा त्यांनी केला.

कश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी बऱयाच ऑफर्स – पाकिस्तान

कश्मीरप्रश्नी हिंदुस्थान आणि पाकिस्तान याच्यात मध्यस्थी करणाऱया बऱयाच देशांच्या ऑफर्स आल्या आहेत. पण हिंदुस्थाननेही मध्यस्थी स्वीकारली तरच पुढच्या गोष्टी शक्य होतील, असा कांगावा पाकिस्तानने करायला सुरुवात केली आहे. ‘कश्मीरमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. कर्फ्यु सगळीकडे लागला आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी मोहम्मद फैजल यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या