विराटच्या खराब कामगिरीचा लग्नाशी संबंध जोडला, शोएब अख्तरच्या टीकेमुळे वादळ

क्रिकेटपटू विराट कोहली याचं नाव लोकप्रिय आणि यशस्वी क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झालं आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी दिलेल्या योगदानामुळे त्याचे चाहते त्याला रन-मशिन म्हणून बोलावतात. अवघड स्थितीतील सामने विराट कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी करत जिंकवून दिले होते. कोहली मैदानातील खेळामुळे जसा सातत्याने चर्चेत राहिला आहे, तसा तो मैदानाबाहेरही सातत्याने चर्चेत राहिला आहे. खासकरून अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याच्याभोवतीचे प्रसिद्धीवलय वाढायला लागले. मात्र यासोबतच त्याच्यावर टीकाही व्हायला सुरुवात झाली, ही टीका होत असताना त्याची बायको अनुष्का ही देखील टीकाकारांचे लक्ष्य होऊ लागली.

शोएब अख्तर याने अनुष्का शर्मा हिचे नाव न घेता तिच्यावर आणि विराटवर टीका केली आहे. कोहलीने लग्नाऐवजी त्याच्या क्रिकेटवर जास्त लक्ष द्यायला हवं होतं असं शोएबचं म्हणणं आहे. त्याने म्हटलंय की ‘120 शतके झाल्यानंतर त्याने लग्न केलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. जर मी त्याच्या जागी असतो तर लग्न केलं नसतं. जे झालं (लग्न करणे) तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता.’

शोएबने म्हटलंय की ‘विराटने लग्न करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे म्हणणं अयोग्य ठरेल. क्रिकेटमधील ही 10-12 वर्ष पुन्हा आयुष्यात येत नाही. क्रिकेटप्रेमींना विराटचा खेळ आवडतो आणि त्याला 20 वर्षांपासून जे प्रेम प्रशंसकांकडून मिळत होतं, ते त्याने अबाधित ठेवायला हवं होतं.’ लग्नाचा दबाव क्रिकेटमधील कर्णधारावर परिणाम करत असतो. मुलं कुटुंब यांचा दवाबही क्रिकेटपटूवर असतो. जबाबदाऱ्या वाढतात तसा क्रिकेटपटूवरील दवाबही वाढत जातो असं शोएबने म्हटलं आहे.

क्रिकेटपटूच्या आयुष्यातील 5-6 वर्षे तो शिखरावर असतो. विराट गेली 20 वर्ष क्रिकेट खेळत असून आता त्याला संघर्ष करावा लागत असल्याचं निरीक्षण शोएबने नोंदवलंय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना अनुष्का आणि विराटची मुलगी वामिका हिची दृश्ये व्हायरल झाली होती. यामुळे विराट आणि अनुष्का संतापलेले आहेत. वामिकाला जगासमोर आणू नये असं आवाहन या दोघांनी पुन्हा एकदा माध्यमांना केले आहे.