एके-47 रायफल्स आणि अमली पदार्थांचा प्रचंड साठा जप्त, पालघरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कामगिरी

ak-47-rifle

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भयंकर रक्तपात करण्याचा डाव पालघर पोलिसांनी उधळून लावला. भयंकर शस्त्रसाठय़ासह पोलिसांनी दोघांवर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. याबरोबरच तब्बल साडेतेरा कोटी किमतीचे ड्रग्जही पोलिसांनी जप्त केले. आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, हा शस्त्रसाठा कोणी पाठवला, कोणी मागवला याचा कसून तपास सुरू असून या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरून गेला आहे.

विधानसभा निवडणूक  प्रचाराच्या धामधुमीसाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी करत असतानाच मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना चिल्हार फाटय़ावरील हिंदुस्थान ढाब्यावर काही इसम मोठा शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती मिळालीदराडे यांनी तत्काळ पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना याबाबत कळवल्यानंतर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थान ढाबा परिसरात  पोलिसांनी फिल्डिंग लावली.

सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन संशयास्पद व्यक्ती एका प्लॅस्टिकच्या वजनदार गोणीसह ढाब्यावर आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सिद्धवा जायभाये, सुहास कांबळे, उपनिरीक्षक अल्पेश विशे, सहाय्यक फौजदार भरत पाटील, पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, नरेश जनाठे, नरेंद्र पाटील, शिवाजी भोईर, उत्तम बिरारी, दीपक पोटे, पोलीस शिपाई सचिन गोल्हे यांच्या पथकाने या इसमांवर झडप घातली. यावेळी त्यांच्याकडे असलेला अद्ययावत शस्त्रसाठा आणि अमली पदार्थांचा कोटय़वधी रुपयांचा साठा पाहून पोलीसही चक्रावून गेले. या कारवाईची माहिती पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्याचवेळी चौकशी सुरू असल्याने आरोपींची नावे तूर्त सांगण्यास नकार दिला.

मोबाईल कॉलची कसून तपासणी

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल जप्त केला आहे. त्यांनी कोणाला कॉल केले, त्यांना मोबाईलवरून कोणी सूचना दिल्या, या शस्त्रपुरवठय़ातील म्होरके कोण, या शस्त्रांचा पुरवठा कोणत्या दहशतवाद्यांना केला जाणार होता याची कसून तपासणी सुरू आहे.

पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा मौका साधला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उद्या मंगळवारपासून अर्ज भरण्यासाठी उमेदवार वाजतगाजत निघणार आहेत. पुढचे पंधरा दिवस प्रचाराची राळ उडणार आहे. याच काळात तीन एके 47 सह हा शस्त्रसाठा महाराष्ट्रात पाठवण्यात आला. निवडणुकीत   पोलीस यंत्रणेसह राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते व्यस्त असल्याचा मौका साधत मोठा घातपात घडवण्याचा डाव या कारवाईमुळे उधळला गेला आहे.

प्रताप दराडे यांचे मजबूत नेटवर्क

मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून येथील  बेकायदा धंद्यांना चाप लागला आहे. दराडे यांच्या मजबूत नेटवर्कमुळेच हा भयंकर शस्त्रसाठा कोणताही घातपात होण्याआधीच पोलिसांच्या हाती लागला आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी दराडे यांच्यासह जितेंद्र वनकोटी, सिद्धवा जायभाये यांच्या टीमला शाबासकीची थाप दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या