पालघरला तीन फेरीवाल्यांना एक्प्रेसने चिरडले

सामना प्रतिनिधी । पालघर

पालघर रेल्वे स्टेशनजवळ तीन फेरीवाल्याना मुंबईकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसने उडवले. त्यात तिघांचाही मृत्यू झाला. तीनपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून तिसऱ्या मृत फेरीवाल्याचा शोध सुरू आहे.

पालघर येथे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस ही गाडी फलाट क्रमांक तीनवर (सायडिंग ट्रक) येणार अशी उद्घोषणा झाल्याने ही गाडी सायडिंगला धीम्या गतीने जाताना पकडण्यासाठी तीन फेरीवाले (चहावाले) रेल्वे पॉवर स्टेशनजवळ दोन नंबर ट्रकवर बसून राहिले होते, मात्र रेल्वे कंट्रोलने हा प्लॅन बदलून सौराष्ट्र जनता फलाट क्र. एकवर आणण्याचा निर्णय घेतला.
आपण पकडणार असलेली गाडी फलाट तीनच्या लूप लाइनमध्ये शिरेपर्यंत समोरून गाडी येणार नाही या समजामुळे हे फेरीवाले लाइन दोनवर निर्धास्तपणे बसले होते. दरम्यान दोन नंबरवरून मुंबईकडे जाणारी इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस ही जलद गाडी आली आणि बेसावध असलेले तीन फेरीवाले या गाडीखाली चिरडले गेले.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना पालघर पॉवर सेक्शन म्हणजे तीन नंबर सायडिंग ट्रककडे वळणाऱ्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली असून यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. या दोघांची ओळख पटलेली नसून तिसऱ्या फेरीवाल्याचा शोध सुरू आहे.