
शेतीला जोडधंदा असावा म्हणून बँकेतून बारा लाख रुपयांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हशी खरेदी केल्या. बँकेशी संलग्न असलेल्या विमा कंपनीकडून त्या म्हशींचे विमा कवचही घेतले. त्यापैकी दोन म्हशी मेल्या, पण विमा काढलेला असतानाही बँक आणि विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मोखाड्यातील टाकपाडा गावातील संतापलेल्या शेतकऱ्याने मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये ठेवून बँकेसमोर आणली. नुकसानभरपाईचे पैसे द्या, नाहीतर तुमची म्हैस परत घ्या, असा संताप शेतकऱ्याने व्यक्त केला. या घटनेमुळे बँकेसमोर मोठा गोंधळ उडाला. अखेर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकसानभरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच मोखाड्याच्या बाजारपेठेतील हे म्हैस आख्यान संपले.
मोखाड्याच्या टाकपाडा गावात राहणारे शेतकरी नवसू दिघा यांनी शेतीच्या उत्पन्नाबरोबरच पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी 2022 मध्ये मोखाड्याच्या बँक ऑफ बडोदा शाखेतून बारा लाखांचे कर्ज घेतले. त्यातून त्यांनी दहा दूध देणाऱ्या म्हशीही विकत घेतल्या. भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर तोटा होऊ नये म्हणून त्यांनी म्हशींचा बडोदा बँकेच्या माध्यमातूनच चोला मंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा उतरवला. एखादी म्हैस दगावली तर तिची भरपाई मिळेल हा त्यामागील हेतू होता.
त्यांच्या तबेल्यातील पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली तर दुसरी म्हैस ३१ ऑक्टोबरला मृत्युमुखी पडली. विमा काढलेला असतानाही बँक ऑफ बडोदा शाखेच्या कर्मचाऱ्यांमुळे दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नव्हते. आता या मेलेल्या म्हशीचेही नुकसानभरपाईचे पैसे मिळणार नाहीत म्हणून नवसू दिघा यांनी मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये भरली आणि बँकेच्या समोर आणून ठेवली.
एक तर मला विम्याचे पैसे द्या, नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी ठाम भूमिका नवसू दिघा यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. यामुळे बँकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनीही बँकेत धाव घेतली. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी नेहमी शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा आरोपही त्यांनी केला.
नवसू दिघा यांना 31 दिवसांत विमा कंपनीकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळवून दिली जाईल. इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून दिला जाईल असे मी लेखी स्वरूपात लिहून देत आहे.
हरिचरण वडला
(वरिष्ठ अधिकारी, बँक ऑफ बडोदा)
माझ्या दोन म्हशी मेल्या आहेत. बँकेकडे याआधी एका म्हशीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कागदपत्रे जमा केली, पण नुकसानभरपाई मिळाली नाही. आता 31 दिवसांत विम्याचे पैसे मिळाले नाही तर बँकेला टाळे ठोकून उपोषण करेन.
नवसू दिघा (नुकसानग्रस्त शेतकरी)




























































