हा धार्मिक संघर्ष नाही, उगाच आग लावू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला कडक दम

8585

पालघर येथील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीचे चोर फिरत असल्याच्या गैरसमजातून दोन साधूंसह तिघांची हत्या झाल्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. मात्र यावरून सरकार काय करतंय, सरकार गप्प आहे का असे सवाल करून धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी क्राइमकडे सोपविण्यात आला असून 100 हून अधिक आरोपींना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. जे फरारी आहेत त्यांनाही शोधून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही. तेव्हा उगाचच आदळआपट करून धर्मा धर्मात आग लावण्याचं काम करू नये! सोशल मीडियातून आग पसरवणाऱ्यांनाही शोधून काढू, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

पालघर येथे झालेल्या मॉबलिंचिंग धर्मा धर्मात आग भडकवणाऱ्यांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, यात कोणतंही धार्मिक कारण नाही. कोणीही तिथे धर्मा धर्मात आग लावण्याचं कारण शोधू नये. मी अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने सांगतो याला जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होणार अससल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धार्मिक रंग देणाऱ्यांनी गडचिंचलेला जाऊन यावं

साधूंची हत्या झाली, सरकार चूप क्यों है. क्यूं आप चूप बैठे हो, असे सवाल केले जात आहेत. पण ज्या दुर्गम भागात हा प्रकार घडला ते गडचिंचोली हे गाव म्हणजे एक पाडा आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिवे बंद करून मेणबत्त्या पेटविण्याचे आवाहन केले. तेव्हा दिवे बंद केल्यानंतरही जेवढा अंधार पडला नसेल, त्यापेक्षाही मीट्ट काळोखात रात्री 12.30 वाजता हा प्रकार तिथे घडला. या मिट्ट काळोखातही तिथले स्थानिक एसपी तिथे पोहोचले. दुर्दैव म्हणजे या गडचिंचोली गावात महाराष्ट्रातून जायला रस्ताही नाही. असे असतानाही पोलीस तिथे पोहोचले. मात्र तरीही ज्यांना दोन धर्मातील हा काही प्रकार घडला असे वाटते त्यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर या भागात जाऊन यावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेला धार्मिक रंग देणाऱ्यांना केले.

मॉबलिंचिंगचे प्रकार मागील पाच वर्षांतही घडले

सरकार करोनासोबत युद्ध लढत असताना पालघरमध्ये 16 एप्रिलला लांच्छनास्पद प्रकार घडला. यापूर्वी देखील मागील पाच वर्षांत अशा मॉबलिंचिंगच्या घटना घडलेल्या आहेत. बाहेरील अनेक राज्यातही हे मॉबलिंचिंग झालेलं आहे. आपल्या राज्यातही मागील पाच वर्षांत अशा घटना घडलेल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी धुळे, चंद्रपूर येथेही असा प्रकार घडला होता. त्याची कारणं वेगवेगळी असतील, पण मला या राजकारणात पडायचं नाही. मॉबलिंचिंग होता कामा नये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मात्र हे घडल्यानंतर सरकार काय करतंय हा प्रश्न उपस्थित केला जातो. पण या सरकारने जे करायचं होतं ते केलं आहे.   आज वचन देतोय यात जे कोणी आरोपी असतील ते हल्लेखोर सुटू शकत नाहीत, अशा शब्दांत मॉबलिंचिंगवरून राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले.

धार्मिक वादातून हे घडलं नाही, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही म्हटलंय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फोन केला होता. त्यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनाही हे माहीत आहे की यात सांप्रदायिक वाद नाही. धर्मा धर्मातला वाद नाही. ते देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे सर्व माहिती असते. त्यांनी सांगितलं की इथे असं काही घडलेलं नाही. पण काळजी घ्या, असं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासोबतही बोलणं झालं असून मॉबलिंचिंगचा प्रकार होता कामा नये कारणं काहीही असतील पण हा प्रकार तो महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही, असं त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेकरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून काताकरण तापकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याकिषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्कनीकरून बोलून सर्क कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संकट अजून टळलेलं नाही लॉकडाऊन उठवलेला नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 20 एप्रिलपासून ज्या भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला अशा नागरिकांना आवाहन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, लॉकडाऊनचे दिवस मोजण्यात अर्थ नाही. या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा आजपासून गणपत्ती बाप्पा मोरया बोलून थोडेफार उद्योग सुरू करीत आहोत. ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये काय करावं आणि काय करू नये अशा सूचना देऊन आपण हळूहळू हातपाय हलवायला सुरुवात केली आहे. आता संकट टळलंय असा समज करून घेऊ नका. लॉकडाऊन उठवलेला नाही. फक्त आणि फक्त रुतलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ही एक सुरुवात केली आहे. आपण सर्वजण कसे वागतो यासाठी ही एक ट्रायल आहे. लॉकडाऊन लवकर संपवण्याचं आपल्याच हातात आहे. जेवढी आपण शिस्त पाळाल तेवढं लवकर संकटावर मात करून यातून आपण बाहेर पडू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सोशल मीडियावरून आग लावणाऱ्यांना पकडणार

सोशल मीडियावरून आग लावणारे जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहांना सांगितलं आहे. या आग लावणाऱ्यांना तुम्हीही शोधा आणि आम्हीही त्यांचा शोध घेतो. प्रत्यक्षा एक घडतं आणि आग लावणारे निघून जातात. त्यांच्यापर्यंत याची झळ पोहोचत नाही.  त्यांनासुद्धा लवकरात लवकर शोध लावून पकडणार आहोत. त्याचप्रमाणे जे कोणी आरोपी आहेत. त्यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना कडक शिक्षा होणारच कोणीही यातून सुटणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तर पुन्हा बंधनं घालावी लागतील

लॉकडाऊन उठवलेला  आहे. अशा पद्धतीने गर्दी व्हायला लागल्याची माहिती काही ठिकाणांहून येत आहे. अशी गर्दी व्हायला लागली, सोशल डिस्टन्सिंग जर पाळलं गेलं नाही तर कदाचित हालचालींवर निर्बंध अधिक घट्ट करावे लागतील. आपल्या हालचालींवर पुन्हा बंधन घालावी लागतील. ही बंधनातील शिथिलता आहे पूर्ण बंधनमुक्त झालेलो नाही. सहा आठवडय़ांत एका संयमाने आणि जिद्दीने नाईलाजाने घरात बसलात त्याप्रमाणेच आपले डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल यंत्रणा हे सगळेच अत्यंत तणावाखाली मेहनत करीत आहेत. करोनाविरुद्ध युद्ध हीच आजची आपली प्राथमिकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दादरा-नगरहवेली सीमेवर थांबू दिले असते तर हा प्रकार घडला नसता!

लॉकडाऊनच्या काळात कुठेही जाता येत नाही अशा वेळी जिथे आहोत तिथून बाहेर पडण्याची इच्छा होते. यातून हा प्रकार घडला. आपण सर्वांनीच माणुसकी पाळायला हवी. हे दोन साधू आपल्या चालकासह ज्यावेळी दादरा-नगरहवेली सीमेवर पोहोचले. त्यावेळी त्यांना तिथेच थांबवून क्वॉरंटाइन करून ठेवलं असतं. महाराष्ट्र सरकारसोबत सल्ला मसलत केली असती आणि प्रवेश नाकारून त्यांना परत पाठवलं नसतं तर हा लांच्छनास्पद प्रकार घडलाच नसता असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पालघर मॉब लिंचिंगप्रकरण तपास सीआयडीकडे

पालघर येथे चोर फिरत असल्याच्या संशयावरून दोन साधूंसह तिघांची हत्या झाल्याचा संतापजनक प्रकार घडला. या मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, प्रमुख पाच हल्लेखोर आणि 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वसन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्याची इच्छा असलेले दोन साधू पालघरपासून 110 किमी अंतरावरील दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर गेले असता हा प्रकार घडला. तिथून गुजरातमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या साधूंना या सीमेवर अडवण्यात आलं. तिथून ते परतत असताना जमावाने त्यांच्या अनपेक्षितरीत्या हल्ला केला. यात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यावेळी तिथे आलेल्या पोलीसांच्या गाडय़ांवरही दगडफेक करण्यात आली. या भागात रात्रीच्या वेळी चोर फिरत असल्याच्या अफवेतून  दुर्दैवाने हा लांच्छनास्पद प्रकार घडला. हे लोक गैरसमजाला बळी पडून त्यातून हा प्रकार घडला आहे.

डीजी अतुल कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी

याप्रकरणी दोन पोलिसांना तत्काळ निलंबित केलं आहे. सीआयडी क्राइमचे डीजी अतुल कुलकर्णी त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली शोध घ्यायला सांगितलं आहे. हा सगळा तपासच सीआयडी क्राइमकडे दिलेला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 100हून अधिक जण अटक करून तुरुंगात आहेत. 9 अल्पवयीन मुलं आहेत त्यांना सुधारगृहात पाठवलेलं आहे. आणखी काही लोक जे फरार आहेत. काही जंगलात लपून बसले आहेत, काही दादरा नगर हवेलीत गेलेले आहेत. त्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा केल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले.

पालघर प्रकरणी सरकार गंभीर असून याबाबत उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी त्याच रात्री कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. ते अकोला येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या