रिलायन्स कंपनीने कवडीमोल दराने जमिनी लाटल्या!

72

सामना प्रतिनिधी । ठाणे

औष्णिक प्रकल्पासाठी जमिनीचा मोबदला देताना सरकारने केलेल्या फसवणुकीनंतर धुळ्याच्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन केलेल्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हादरला असताना आता पालघर जिह्यातील आणखी ४१६ ‘धर्मा पाटील’ स्वतःचा बळी देण्याच्या तयारीत आहेत. गुजरातमधून आणलेल्या इथेन गॅस पाइपलाइनसाठी रिलायन्स कंपनीने सरकारी संगनमताने फुटकळ भावात जमीन खरेदी करून या शेतकऱयांची घोर फसवणूक केली आहे. कंपनी एकच, प्रकल्प एकच, जिल्हाही एकच तरीही जमिनीचा मोबदला देताना भेदभाव करणाऱया रिलायन्सविरोधात पालघर जिह्यात प्रचंड असंतोष खदखदत असून येत्या १० जुलै रोजी ४१६ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.

इथेन गॅस वाहून नेण्याकरिता रिलायन्स कंपनीने गुजरातच्या दहेजपासून रायगड जिह्यातील नागोठण्यापर्यंत तब्बल पाचशे किलोमीटरची पाइपलाइन टाकली आहे. या इथेन पाइपलाइनसाठी पालघर जिह्यातील तलासरी, डहाणू, पालघर, वाडा व विक्रमगड येथील शेकडो शेतकऱयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. पिढ्यान्पिढ्यांची सुपीक आणि बागायती शेती या पाइपलाइनखाली चिरडली गेली आहे. मात्र या जमिनीचा मोबदला देताना रिलायन्स कंपनीने भूसंपादन खात्याशी संगनमत करून पालघर जिह्यातील शेतकऱयांची सपशेल फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

दुसऱया पाइपलाइनसाठी २०१६ मध्ये जमीन संपादित करताना रिलायन्स कंपनीने डहाणू आणि तलासरीमधील शेतकऱयांना पीक नुकसानीपोटी प्रतिगुंठा ९ हजार ६८० इतकी नुकसानभरपाई देत असल्याचे लेखी पत्र दिले. मात्र याच रिलायन्सने वाडा, चिंचघर येथील शेतकऱयांना २ लाख ५० हजार ते ४ लाख रुपये प्रतिगुंठा मोबदला दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे डहाणू आणि तलासरीतील तब्बल ४१६ शेतकऱयांच्या मोबदल्यात रिलायन्स कंपनीने भूसंपादन खात्याच्या मदतीने मोठा झोल केल्याचा आरोप तलासरी येथील मधुकर सखाराम काकरा या शेतकऱयाने केला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक

तलावली, कोंडगाव, विलशेत, सोमटा, चिंचपाडा, बराणपूर, घोळ, भराड, चारोटी, महालक्ष्मी, धानोरी, देऊर, चिंचले, सासवण या गावांतील ४१६ आदिवासी शेतकऱयांच्या जमिनींची रिलायन्सने कवडीमोल किंमत केली आहे. ही व्यथा मांडण्यासाठी येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. आम्ही जमीन फक्त एका पाइपलाइनसाठी दिली, पण रिलायन्स आता त्यातून दुसरी पाइपलाइन नेत आहे. त्यासाठी पीक खर्चापोटी प्रतिगुंठा ९ हजार ६८० रुपये इतकी किरकोळ रक्कम देऊन आमच्या तोंडाला पाने पुसत आहे, पण वाडा, चिंचघर येथील शेतकऱयांना रिलायन्सने अडीच ते चार लाख रुपये प्रतिगुंठा इतका मोबदला दिला आहे. त्याचे पुरावेही आम्ही जिल्हाधिकाऱयांना आणि रिलायन्सला दिले आहेत. आम्हाला २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार भरपाई मिळायलाच हवी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

रिलायन्सचे हात वर…

गॅस पाइपलाइनसाठी आम्ही डहाणू, तलासरीत २००८ मध्येच भूसंपादन केले आहे. आता २०१८ मध्ये त्यातून दुसरी पाइपलाइन जाणार असली तरी शेतकऱयांना पुन्हा जमिनीचा मोबदला मिळणार नाही. शेतकऱयांनी १९६२ चा पीएमपी अॅक्ट वाचावा. त्या नियमानुसार त्यांना फक्त पीक पाण्याची नुकसानभरपाई देऊ असे सांगत रिलायन्सचे प्राधिकृत अधिकारी नरेश पाल यांनी हात वर केले आहेत. शेतकऱयांना पटत नसेल तर त्यांनी कोर्टात जाऊन दाद मागावी, अशी मल्लिनाथीही पाल यांनी केली.

पत्र देऊन शेतकऱयांना फसवले

रिलायन्सच्या दुसऱया गॅस पाइपलाइनसाठी जमिनी संपादन करताना रिलायन्सचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता अधिकारी नरेश पाल यांनी डहाणू तालुक्यातील शेतकऱयांना १८ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी पत्र दिले आहे. त्यात पीक नुकसानीपोटी ९ हजार ६८० रुपये प्रतिगुंठा मोबदला देत असल्याचे नमूद केले आहे. परंतु ‘दहेज-नागोठणे इथेन गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट’च्या सक्षम अधिकाऱयांनी जिह्यातील इतर शेतकऱयांना ९ हजार ६८० रुपये प्रतिगुंठय़ापेक्षा जास्त दर दिला तर त्या फरकाची रक्कम बाधित शेतकऱयांना देण्यास रिलायन्स कंपनी बांधील असल्याचे पाल यांनी दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या