गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत उत्स्फूर्त स्वागत

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

संबंध महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत 26 जुन बुधवारी आगमन झाले. याआधीच हा पालखी सोहळा सकाळी औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीतून शहराच्या दिशेने रवाना झाला. श्रींच्या पालखीचे परळीच्या भाविकभक्तांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. या दिंडीचे यंदा हे 52 वे वर्ष आहे यात 650 वारकरी सहभागी झालेले आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या पालख्यांचे आगमन परळी शहरात होत आहे. या पालखींचेही स्वागत परळीचे भाविक मनोभावे स्वागत करत असल्याचे दिसत आहे. तसेच भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील श्रींची पालखी मराठवाड्यात नुकतीच दाखल झाली आहे. श्रींची पालखी काल औ.वि.केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीत मुक्कामी थांबली होती. सदर श्रींची पालखी आज सकाळी 8 च्या सुमारास परळीच्या मुख्यरस्त्यावरून मार्गस्थ झाली.

या पालखीचे नागरीकांनी उत्साहात स्वागत केले व दर्शन घेतले. काही ठिकाणी वारकर्‍यांच्या अल्पोपहाराची सोय केली होती. कांही जणांनी फराळ, चहापाणी, भोजनाची व्यवस्थाही केली होती. श्रीच्या दिंडीत असलेल्या वारकर्‍यांच्या मुखातून हरे कृष्णा हरे रामा, गण-गण गणात बोते, ज्ञानोबा – तुकारामांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. संत जगमित्र नागा मंदिरात श्रींची आरती करून पुजारी औटी यांनी नैवैद्य दाखवला. पंढरपुरकडे निघालेल्या शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा संत जगमित्र मंदीरात बुधवारी मुक्कामी थांबणार आहे. दि.27 रोजी सकाळी 6 च्या सुमारास ही पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार आहे.

वैद्यनाथ नगरीच्या नगरप्रदक्षिणेला महत्व
गजानन महाराज यांच्या पालखीचे 25 रोजी सायंकाळी परळी शहरालगत शक्तीकुंज वसाहत येथे मुक्कामासाठी आगमन झाले. राममंदिर येथे रात्री व आज सकाळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरच्या वारी मार्गा वरील बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पावन झालेले परळी हे हरी-हर क्षेत्र असल्याने वारकऱ्यांमध्ये याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचबरोबर संत जगमित्रनागा महाराजांचीही येथेच समाधी असून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे परळीत येणाऱ्या दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात.

देवलाही परळी-पिंपळा मार्ग झाला खडतर
दरम्यान समस्त मानवजनाचा तारणहार असलेला गजानन महाराजांचा यंदाचा पालखीचा मार्ग खडतर असणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. या रखडलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे. कमीत कमी गजानन महाराजांच्या पालखीसाठी या मार्गाची तात्पुरती डागडुजी व्हायला पाहिजे होती मात्र तसे झालेले दिसत नाही. तसेच परळीतही न.प.ने पालखी मार्गावर साधा झाडूही मारला नसल्याचे दिसले.