पणजी – एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

395

उत्तर गोव्यातील खोर्ली-म्हापसा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्जबारी झाल्याने कुटूंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता म्हापसा पोलिसांनी व्यक्त केली आहे. मूळ महाराष्ट्रामधील नेसरी-गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील धुमाळे कुटुंबीय काही वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होते. आत्महत्येची घटना सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. यात दांम्पत्यासह अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली. शाहू धुमाळे (41), कविता धुमाळे (34), पारस धुमाळे (9) व साईराज धुमाळे (अडीज वर्षे) अशी मयतांची नावे आहेत.

म्हापसा पोलिसांना घटनास्थळावरून ‘चारपानी सुसाइड नोट’ सापडली आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद पोलिसांनी केल्याची माहिती म्हापसा पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा असणारे उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी दिली आहे. एडविन कुलासो यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे पोलिसांना शाहू धुमाळे यांचा मृतदेह हा फ्लॅटच्या हॉलमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. तर पत्नी कविता व दोन्ही मुलांचा मृतदेह बेडरूममध्ये कॉटवर आढळले. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविले आहेत. मयत शाहू धुमाळे यांनी अगोदर पत्नीसह दोन्ही मुलांना ठार मारून नंतर स्वत: गळफास घेवून आत्महत्या केल्याचा संशय म्हापसा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तापास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या