पंचगंगा, शिवशक्तीने जिंकला शेलारमामा कबड्डी चषक

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ शिवसैनिक अरुण दत्तात्रय शेलार यांच्या स्मरणार्थ व शेलार फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील द्वितीय श्रेणी पुरुष गटात पंचगंगा संघाने तर महिला गटात शिवशक्ती संघाने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. पंचगंगाचा नितीन सावंत पुरुषांत, तर शिवशक्तीची पूजा यादव महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

शेलारमामा फाऊंडेशनने जय भारत सेवा संघाच्या सहकार्याने ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे आयोजित केलेल्या स्पर्धेतील द्वितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात पंचगंगाने ओम श्री साईनाथचे आव्हान २५-२८ असे संपवीत रोख रु. ७०००/- व ‘शेलारमामा चषक’ आपल्या नावे केला. उपविजेत्या साईनाथला रोख रु. ५०००/- व चषकावर समाधान मानावे लागले. सुरुवातीपासून सावध खेळ करीत पंचगंगाने मध्यांतराला १२-०९ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ती थोडी वाढवीत शेवटी ७ गुणांनी सामना जिंकला. नितीन सावंत, राज ठुकरूल, रवींद्र सावंत यांच्या कल्पक खेळाला याचे श्रेय जाते.

महिलाच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने मुं. पोलीस संघाचा प्रतिकार २७-२३ असा मोडून काढत रोख रु.५०००/- व ‘शेलारमामा चषका’वर हक्क सांगितला. उपविजेत्या पोलिसाच्या संघाने रोख रक्कम ३००० व चषक पटकावला. मध्यांतराला १४-१० अशी आघाडी घेणाऱया शिवशक्तीला उत्तरार्धात कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. शिवशक्तीच्या या विजयात पूजा यादव, तेजस्विनी चौगुले, साक्षी रहाटे यांचा खेळ महत्त्वपूर्ण ठरला.

पंचगंगाचा रवींद्र सावंत उत्कृष्ट चढाईचा, तर ओम श्री साईनाथचा सर्वेश लाड उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. लक्षवेधी खेळाडू ठरला तो ओम श्री साईनाथचा सिद्धेश राऊत. महिलांत लक्षवेधी खेळाडू ठरली ती पोलीसची आरती यादव. शिवशक्तीची साक्षी रहाटे उत्कृष्ट पकडीची, तर पोलीसची सिद्धी वाफेकर उत्कृष्ट चढाईची खेळाडू ठरल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नाटय़-सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार (आयोजक), नगरसेवक आशीष चेंबूरकर, नीरंजन नलावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.