पंचगंगा स्मशानभूमीच्या दानपेटीत 3 लाख 86 हजार; गेल्या वर्षीपेक्षा एक लाख दान कमी

पंचगंगा नदी घाटावरील स्मशानभूमीत असलेल्या दानपेटीत यंदा 3 लाख 86 हजार जमा झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1 लाख 10 हजार कमी रक्कम दान झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. महानगरपालिकेकडून तोडण्यात येणाऱया वृक्षांची विक्री करण्याऐवजी हा लाकूडफाटा स्मशानभूमीत पाठविला जातो, तर होळीला अनावश्यक शेणी जाळण्याऐवजी अनेक मंडळांकडून मोठय़ा प्रमाणात स्मशानभूमीला शेणी दान करण्यात येते. याशिवाय पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी येणारे नागरिक या दानपेटीत दान करतात. या गुप्तदान पेटय़ा दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात.

यंदा पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदानपेटी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार, सहायक आरोग्य निरीक्षक सौरभ घावरी, आरोग्य निरीक्षक महेश भोसले यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीत 3 लाख 86 हजार 224 रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी मार्च 2022 मध्ये तब्बल 4 लाख 95 हजार 317 रुपये प्राप्त झाले होते.