दोन दशकांची मुंबईतील ‘पंढरीची वारी’

>> ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. निर्मळ आणि निरपेक्ष भक्तीबरोबर सामाजिक ऐक्याचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिले जाते. याच पंढरीच्या वारीचा अनुभव मुंबईकरांना गेल्या वीस वर्षांपासून घेता येत आहे. या संपूर्ण प्रवासात दैनिक ‘सामना’ आणि शिवसेना वारकऱयांसोबत राहिली आहे. आता हा सोहळा मुंबईकरांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग झाला आहे. या सोहळय़ाच्या दोन दशकांच्या वाटचालीचा श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे सहसचिव ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी घेतलेला मागोवा….

पंढरीशी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।।
अशी साद संत तुकाराम महाराज यांनी संसारी माणसांना घातली आहे. त्यात हा जो पांडुरंग आहे तो दीन-दुबळ्या कष्टकऱयांचा सोयरा असल्याचा विश्वास तुकाराम महाराज देतात. त्याची अनुभूतीही पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते. लाखो शेतकरी, कष्टकरी स्री-पुरुष या वारीमध्ये सहभागी झालेले असतात. या वारीत मिळालेली ऊर्जा या कष्टकऱयांना त्यांच्या जीवनात आलेल्या संकटांशी भिडण्याचे बळ देते. अलिकडे शहरात राहणाऱया तरुणाईलाही या सोहळ्याची भुरळ पडू लागली आहे. काहीजण शनिवार-रविवारचा दिवस निवडून आवर्जून एखादा दिवस वारीमध्ये चालतात. मुंबईसारख्या महानगरात रोजच्या दगदगीच्या जीवनात सर्वांनाच अशी सवड मिळत नाही. म्हणून हा सोहळा मुंबईकरांनाही अनुभवता यावा यासाठी 2001 पासून मुंबईत पाडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांना वारकरी संतांच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन घडते. या वाटचालीमध्ये दैनिक ‘सामना’ आणि शिवसेना या सोहळ्याचे अविभाज्य भाग झाले आहेत.

मुंबईत गिरणी कामगार, कारखान्यांतील कामगार होते तेव्हा गल्ली-गल्लीतून भजनाचे सूर कानावर येत होते. परंतु 1990 च्या दशकात गिरणी कामगारांवर संकट आले. एक-एक गिरणी बंद पडू लागली. कारखानेही बंद पडू लागले. मुंबईतील कष्टकरी मुंबईबाहेर फेकला जाऊ लागला. कष्टकरी जसा मुंबई बाहेर फेकला जाऊ लागला तसे चाळीचाळीतील भजनाचे स्वर क्षीण होऊ लागले. अनेक हरीनाम सप्ताह बंद पडू लागले. ही गोष्ट कीर्तनाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱया कीर्तनकारांच्या लक्षात येऊ लागली. वारकरी संतांचा विचार टिकला पाहिजे यासाठी मुंबईत पाडुरंगाचा पालखी सोहळा सुरू करण्याचा विचार सुरू झाला. ज्येष्ठ कीर्तनकार रामेश्वर महाराज शास्री, मुंबईच्या वारकरी संप्रदायावर प्रभाव असणारे रामदास महाराज मनसूख यांचे पुतणे संतदास महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, नामदेव महाराज चव्हाण, मधुसूदन महाराज पांडव यांनी मुंबईत पालखी सोहळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. वरील सर्व कीर्तनकार मंडळी आपले व्यक्तिगत कार्यक्रम सोडून दोन महिने मुंबईत राहिले. 2001 साली पहिला सोहळा कॉटनग्रीन पूर्व येथील राम मंदिर ते शिवाजी पार्क असा संपन्न झाला. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

मुंबईत सुरू झालेल्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच काही अडचणीही आल्या. त्यातील एक प्रसंग तर वारकऱयांची सत्व परीक्षा पाहणाराच ठरला. ज्या दिवशी पांडुरंगाचा पालखी सोहळा शिवाजी पार्क येथे आयोजित केला होता नेमके त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेचे आयोजन केले होते. खरे तर वारकऱयांनी या सोहळ्यासाठी हे मैदान अगोदर आरक्षित केले होते. ही बातमी कळली तेव्हा वारकरी एकदम हादरून गेले. त्यांनी महापालिका कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा तुमचे मैदान आरक्षित केले होते, पण मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने ते आता तुम्हाला देता येणार नाही, असा पवित्रा तेथील अधिकाऱयांनी घेतला. मोठा पेच निर्माण झाला. पालखी सोहळ्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यावेळी मी दैनिक ‘सामना’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत होतो. मी रामेश्वर महाराज शास्री यांना सोबत घेऊन ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. तेव्हा नेहमीच्या रोखठोक शैलीत ते म्हणाले, ‘तुमच्याकडे मैदानाच्या बुकिंगचा पुरावा आहे ना? मग तुम्ही मागे हटू नका. शिवसेना आणि ‘सामना’ तुमच्या सोबत असेल.’ त्यांच्या या धीराने वारकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला. ‘सोनिया गांधी यांची सभा असली तरी वारकरी शिवाजी पार्कवर धडकणार!’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीचे तीव्र पडसाद उमटले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी वारकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. इतर वृत्तपत्रांनीही मग वारकऱयांचा निर्धार आपल्या वृत्तपत्रातून मांडला. ‘सामना’त तर रोजच या बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत होती. अखेर काँग्रेसने सोनिया गांधी यांची सभा एक दिवस अगोदर घेतली आणि पाडुरंगाचा पालखी सोहळा नियोजित वेळी पार पडला.

वारकऱयांशी ‘सामना’चे असे नाते जुळले. पुढे या सोहळ्याला शिवसेनेचाही मोठा आधार मिळाला. मुंबईत वारकरी भवन असावे, अशी मागणी वारकऱयांनी केली आणि ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केली. इतकेच नव्हे तर प्रत्येक जिह्यात वारकरी भवन उभारण्यात येईल, अशी घोषणाही केली. ‘सामना’च्या वतीने ज्येष्ठ कीर्तनकारांसाठी पुरस्कारही जाहीर केला. या पालखी सोहळ्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्यही ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या सहकार्यातून होत आहे.

शिवाजी पार्क वरील त्या प्रसंगानंतर संस्थेला कायदेशीर अधिष्ठान मिळावे म्हणून नाना निकम यांच्या प्रयत्नांतून रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली संस्था रजिस्टर करण्यात आली. सचिव पदाची जबाबदारी नाना निकम यांनी स्वीकारली तर सहसचिव पद माझ्याकडे आले. उपाध्यक्ष अशोक महाराज सूर्यवंशी तर खजिनदार बळवंत महाराज आवटे झाले. बाबासाहेब महाराज मिसाळ, विलास घुले हे विश्वस्त झाले. पण कोणत्याही पदावर नसताना अनेक वारकरी खूप मेहनत घेतल आहेत. या पालखी सोहळ्यापूर्वी कॉटनग्रीन राम मंदिरात कीर्तन सोहळा होतो. त्याचे सर्व नियोजन श्रीराम भजन मंडळाचे प्रभाकर आव्हाड, सुरेश साळुंखे, सोमनाथ महाराज घुगे, दिनेश मिसाळ हे करतात. त्यातून पालखी सोहळ्याची वातारण निर्मिती होते. आता हा पाडुरंगाचा पालखी सोहळा मुंबईकरांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनला आहे. वारकरी संतांच्या विचारांचा जागर मुंबई सारख्या माया नगरीत होण्यासाठी हा सोहळा अखंड चालू राहणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या