विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांच्या खासगीकरणाचा डाव उधळला

47

सामना ऑनलाईन । पंढरपूर

विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या २८ देवतांच्या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न जोरदार विरोध करुन पंढरपूरच्या ग्रामस्थांनी उधळला. मंदिरांच्या व्यवस्थेचे खासगीकरण करत मंदिर प्रशासन विठ्ठल मंदिराचेच टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र तीव्र विरोध केल्यामुळे सध्या हा प्रयत्न थंडावला आहे.

मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध केला आणि पंढरपूर बंदची हाक दिली. ग्रामस्थांचाही खासगीकरणाला विरोध होणार याची जाणीव होताच मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी खासगीकरणाची प्रक्रिया थांबवली आहे.

पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे जगात अव्वल करणार असे म्हणणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांनी मंदिरे खाजगी व्यक्तींना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतल्याने भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात आल्यानंतर मुख्य मंदिर आणि विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या २८ देवतांच्या मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले. हे कर्मचारी असूनही अचानक निवडक मंदिरांच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. या खासगीकरणाला मराठा महासंघ, विजय प्रताप युवा मंच, शिवक्रांती युवा संघटना, कोळी महासंघ, महर्षी वाल्मिकी संघ, धनगर समाज उन्नती मंडळ, आर पी आय, संभाजी ब्रिगेड, छावा आदी संघटना आणि पक्षांनी विरोध केला. अखेर खासगीकरणाची प्रक्रिया थांबवून मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी वादावर पडदा टाकला.

आपली प्रतिक्रिया द्या