विठ्ठला सुनी सुनी वाटे पंढरी

>> सुनील उंबरे

आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. मात्र, पंढरीत ना भाविकाची गर्दी, ना हरिनामाचा जयघोष…कोरोनामुळे या वर्षी वारीचा सोहळा ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होत असून, वारकऱ्यांनी गजबजलेला चंद्रभागेचा तीर सोमवारी सुना-सुना दिसत आहे.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी एकत्र आले तर भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. हे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तथापि, शेकडो वर्षांची वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी वारीला फक्त मानाच्या नऊ पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

साधारणतः 200 वारकरी भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी (1 जुलै) प्रातिनिधिक स्वरूपात वारी पोहोचती केली जाणार आहे. मानाच्या पालखीतील भाविकांशिवाय इतर कोणत्याही वारकऱ्याला पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेशच प्रशासनाने काढले आहेत.

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनाने नऊ पालख्यांना अटी-शर्थीवर परवानगी दिली आहे. या पालख्या 30 जूनच्या रात्री 9 वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचतील. प्रत्येक पालखीबरोबर 20 वारकरी असतील. त्यांची कोरोना तपासणी केलेली असावी. वृद्ध वारकरी, मुले यांना पालखीसोबत आणू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या 10 गावांत गुरुवारी (दि. 2 जुलै) रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे.
  • www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या संकेतस्थळावर आणि जिओ टीव्ही, टाटा स्काय डिशवर श्रींचे 24 तास लाईव्ह दर्शन उपलब्ध होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या