जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता! विठुरायाचा निरोप घेऊन वारकरी परतीच्या मार्गाला

प्रातिनिधिक फोटो

वारकरी संप्रदायात सर्वाधिक महत्त्व असलेला गोपाळपूरचा काला करून सात संतांच्या पालख्यांनी पंढरीचा भावपूर्ण निरोप घेतला. मागील वर्षी कोरोनामुळे या परंपरेला संप्रदाय मुकला होता. ‘गोपाळकाला गोड झाला… गोपाळकाल्याने गोड केला’, असा अभंग आळवीत दाटल्या कंठाने वारकरी भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला.

आषाढी व कार्तिकी वारीमध्ये एकादशीनंतर गोपाळपूर येथील काल्याला फार मोठे महत्त्व असते. संतांनीदेखील याचे वर्णन हा सुखसोहळा स्वर्गी नाही असा उल्लेख केला आहे. पंढरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथील टेकडीवर श्रीकृष्णाचे मंदिर आहे. येथे संत जनाबाईने आपल्या भक्तीच्या जोरावर देवाला खेचून आणले होते. येथील मंदिरात लाह्यांचा काला करण्याची परंपरा आहे. त्यानुसार शनिवारी पहाटेपासून आठ संतांच्या पालख्यांनी येथे हजेरी लावत काल्याचा उत्सव साजरा केला. परंपरेनुसार संतांच्या पालख्या वेगवेगळ्या वेळेत दाखल होऊन काल्याचे कीर्तन करतात.

यंदा आषाढी वारीमध्ये दहा संतांच्या पालख्यांना पंढरीत येण्याची परवानगी दिली होती. यापैकी संत निळोबाराय व कौंडिण्यपूर येथील रुक्मिणी मातेच्या पालखीने अनुक्रमे गुरुवार व शुक्रवारी प्रस्थान केले. यामुळे उर्वरित संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत निवृत्तिनाथ, संत सोपान, संत मुक्ताई व संत चांगावटेश्वर यांनी पालखी सोहळ्यासह दाखल होत काला साजरा केला. मागील वर्षी द्वादशीपर्यंतच पालख्यांना राहण्यास परवानगी दिल्याने काल्याचा उत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित झाली होती.

हा सोहळा साजरा केल्यानंतर दुपारी दोन वाजेपासून संतांच्या सोहळ्यांनी आपल्या गावाकडे प्रस्थान केले. हे सर्व सोहळे बसने वारीसाठी दाखल झाले होते. शनिवारी आकर्षकपणे सजविलेल्या बसमधूनच त्यांनी पंढरीचा निरोप घेतला. यावेळी रस्त्यावर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, काल्यानिमित्त गोपाळपूरचे मंदिर सजविण्यात आले होते. ग्रामस्थांनी सर्व पालख्यांचे स्वागत केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त
तैनात होता.

आपली प्रतिक्रिया द्या