सूचनांचा विचार करूनच पंढरीचा सर्वंकष आराखडा

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखीतळ व मार्ग विकास आराखडय़ांतर्गत पंढरपूर व पालखीमार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक आणि पत्रकार यांच्या सूचना, मते विचारात घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरातील जिल्हा नियोजन भवनात सोमवारी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात नव्याने समाविष्ट करावयाच्या कामाबाबत आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह वारकरी संस्थानचे विश्वस्त, महाराज मंडळी, पंढरपूरचे व्यापारी, नागरिक उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे यांनी ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज हजारो भाविक येतात. तसेच, आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रा भरतात. पंढरपुरात येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ा अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी, वारकरी यांनी आठवडाभरात लेखी सूचना द्याव्यात, याचाही विचार करण्यात येईल. आषाढी वारीत पालखीतळावर वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. काही ठिकाणी पालखीतळ अपुरे पडत असल्याने पालखीतळांचा विस्तार करण्याचा आराखडय़ात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालखी सोहळाप्रमुख, महाराज मंडळी यांच्या सूचनाही जाणून घेतल्या जातील. मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन येथील विद्युत रोहित्रे एकाच ठिकाणी एकत्र बसविण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदीवरील नवीन घाटनिर्मिती प्रस्तावित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रभागा वाळवंटात वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी भजन, कीर्तन केले जाते. यासाठी वाळवंटाची वेळोवेळी स्वच्छता व मंदिराचे जतन करावे. वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन व्हावे, अशी मागणी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली.

प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिर व परिसर, पालखीमार्ग व पालखीतळांवर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती दिली. संत चोखामेळा स्मारक, संत तुकाराम महाराज संतपीठ परिसंस्थेची निर्मिती करणे, ‘संतवाणी’ नावाचे एफएम रेडिओ स्टेशन चालू करणे याबाबतची माहिती गुरव यांनी दिली.

वाहनतळांची संख्या वाढविणार

पंढरपुरात वाहनांची संख्याही वाढत आहे. सध्या शहरात 1060 वाहने पार्क होतील एवढी क्षमता आहे. तसेच शहरात सात ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शॉपिंग सेंटरसह वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यामुळे आणखी 2200 चारचाकी वाहने पार्क करता येतील, असेही शंभरकर यांनी सांगितले.

मंदिर परिसर, मंदिर आणि दर्शनबारी येथे सोयीसुविधा देणे, 28 परिवार देवतांची मंदिरे यांचाही समावेश विकास आराखडय़ात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांना समजण्यासाठी चिन्हे, खुणा, सूचना फलक लावण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली

नागरिकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा विचार आहे. यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नवीन प्रस्तावित आराखडय़ाबाबत कोणाला सूचना द्यायच्या असतील तर प्रांत आणि तहसील कार्यालय येथे द्याव्यात. लेखी सूचनांचाही विचार केला जाईल. वारकरी भाविकांना तत्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी प्रांताधिकाऱ्यांऐवजी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या पदाची मागणी आराखडय़ात करण्यात आली आहे. तसेच, काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी शिष्टमंडळाकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.