
मराठी नूतन वर्षातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा सणानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग फुलून गेला आहे. मंदिरात करण्यात आलेली आरास मनमोहक दिसत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ अनेक भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने लाखोंच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱयातून भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांनी चंद्रभागा स्नान करण्यास प्रथम प्राधान्य दिले. स्नानानंतर भाविकांनी रांगेतून पदस्पर्शदर्शन, मुखदर्शन घेण्यास पसंती दिल्याने दर्शनरांग सारडापर्यंत गेली आहे. यामुळे पंढरी भाविकांनी फुलल्याचे चित्र दिसून येते.
राज्याच्या कानाकोपऱयातून तसेच विविध राज्यांतूनदेखील भाविक मोठय़ा संख्येने येत असल्याने त्यांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळे (पार्ंकग) फुल्ल झाली असल्याचे चित्र दिसून येते. येणाऱया भाविकांमुळे मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग, स्टेशन रोड भाविकांनी फुलून गेला आहे. चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविक प्रथमतः चंद्रभागा स्नान करण्यास पसंती देत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पसंती दिली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर भाविकांना दुपारी 12 ते 2 व रात्री 8 ते 10 या वेळेत अन्नक्षेत्रात अन्नदान करण्यात येत आहे. याचा लाभदेखील भाविक घेत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या तुळशी पुजेला सुरुवात झाली आहे. तर, आजपासून चंदनउटी पूजा सुरू होणार आहे. यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविक दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
भाविकांना शॅडोनेटची सावली
उन्हाळा सुरू झाल्याने भाविकांच्या पायाला चटके बसू लागले आहेत. श्री विठ्ठल दर्शनाला आलेले भाविक चप्पल बाजूला ठेवून मंदिरात जातात तसेच मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करतात. या भाविकांना उन्हाचे चटके बसत आहेत. भाविकांची उन्हापासून सुटका करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसर व नामदेव पायरी ते महाद्वार चौक, चौफळा ते पश्चिमद्वार या दरम्यान शॅडोनेट उभारून सावली तयार करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.