भूसंपादन न करता ठेकेदाराने फिरवला शेतकऱ्यांच्या घरादारावर बुलडोझर

सामना ऑनलाईन, पंढरपूर

अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी शासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करीत आपली जीवनयात्रा संपविली. पाटील यांच्या  अग्निसंस्काराची चिता धगधगत असताना सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो शेतकरी धर्मा पाटील यांच्याप्रमाणे हतबल होऊन आत्महत्येचा विचार करायला लागले आहेत, कारण इथे रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता, ठेकेदाराने दहशत आणि शासकीय बळाचा वापर करून शेतातील उभ्या पिकांत आणि घरदारावर बुलडोझर फिरवून दंडेलशाहीने कामाला सुरवात केली आहे. भूसंपादन न करता सुरु केलेले हे बेकायदेशीर काम त्वरीत थांबवा अन्यथा धर्मा पाटील यांच्याप्रमाणे शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतील असा गर्भित इशारा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील गोरडवाडी येथील शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.

केंद्र आणि राज्यशासनाच्या आर्थिक तरतुदीतून रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सातारा-लातूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी च्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. ३२० या किलोमीटर पैकी १५० किलोमीटरचा लांबीचा रस्ता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून जातो. रस्तारुंदीकरणापूर्वी हा रस्ता १० मीटर रुंदीचा होता आता सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणात तो ३० मीटरचा केला जात आहे.  पूर्वीपेक्षा २० मीटरने रस्ता रुंद केला जाणार असल्याने या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करून त्याचा योग्य तो मोबदला देऊन रस्त्यांचे काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने या शेतकऱ्यांची कसलीही परवानगी न घेता रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. या कामात येत असलेली शेतजमीन त्यातील उभे पीक आणि पक्क्या घरावर बुलडोझर चालविला जात आहे.

ठेकेदाराच्या दंडेलशाही विरुद्ध माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून न्याय मागण्याचा प्रयन्त केला मात्र प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही. आजही या रस्त्यांचे रात्रदिवस काम सुरु आहे शेतकऱ्यांना कायद्याचा धाक दाखवत आणि दहशत निर्माण करत सुरु असलेले काम त्वरीत थांबवावे अशी मागणी गोरडवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या