माऊली, तुकोबांच्या पादुकांचे यंदा हवाई प्रस्थान, पायी वारी दिंडी सोहळा रद्द

923

गेल्या सात दशकांची अखंड परंपरा असलेल्या आळंदी-देहू-पंढरपूर आषाढी पालखी सोहळ्याला आजपर्यंत मोगलांच्या फौजा अडवू शकल्या नाहीत की इंग्रजांनी कधी बाधा आणण्याचे धाडस केले नाही. मात्र, जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने अखेर बाधा आणलीय. पंढरपूरचा पायी पालखी दिंडी सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

आळंदीवरून पालखी सोहळ्यासाठी प्रस्ताव ठेवणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि देहूवरून प्रस्ताव घेणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका चारचाकी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका वारकरी सांप्रदाय आणि देहू-आळंदी संस्थांच्या विश्वस्तांनी मांडली. तसेच पायी पालखी दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय सांप्रदायाने एकमताने घेतला. आळंदी आणि पंढरपूरच्या पादूका दशमीला पंढरपूरात जाणार आहेत. पादूका हेलिकॉप्टर की विमानाने न्यायच्या याचा निर्णय त्यावेळची हवामानाची परिस्थिती बघून घेण्यात येईल.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळा कसा पार पाडायचा? पादूका पंढरपूरला कशा न्यायच्या? हा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी उपस्थित होते.

देहू-आळंदी संस्थान, पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी भूमिका मांडल्या. बैठकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासनाने त्यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर पादुकांचे हवाई प्रस्थान करण्यावर बैठकीत सर्वसंमती झाली. आषाढी वारीसाठी राज्यातील 7 मानाच्या पालख्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई मुक्ताईनगर, जळगाव आणि सासवड येथील सोपानकाका पालखी सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आल्याचे संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमाप्रमाणे प्रस्थान होईल. त्याच ठिकाणी दशमीपर्यंत पादुका मुक्कामी राहतील़ शासन जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पादुका पंढरपूरला जातील. देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याबद्दलही आजच्या बैठकीत पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय झाला. पालखी सोहळा सातारा आणि सोलापूर जिह्यातून जाते. त्यामुळे या बैठकीमध्ये सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तसेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला.

सहा पालख्यांनाच पंढरपूरात प्रवेश
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई महाराज आणि संत एकनाथ महाराज या सहा पालख्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

पादुकांसोबत 10 वारकरी
पादुकांसोबत जास्तीत जास्त 10 वारकरी प्रस्ताव ठेवतील आणि पालख्या दशमीला थेट पंढरपूरात जातील.

”आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती खंडीत होऊ नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. ती अखंडीत ठेवण्यासाठी परवानगी दिलेल्या संस्थानच्या पादुकांना राज्य शासनाच्या वतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूरात पोहोचवले जाईल. हवामानाचा अंदाज बघून आणि संस्थानला विश्वासात घेऊन त्याचा निर्णय करू. वारकरी सांप्रदायाच्या सकारात्मक भूमिकेबद्दल शासन त्यांचे आभारी आहे.”- अजित पवार, उपमुख्यमंत्री

”पायी पालखी दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय सर्व संस्थान आणि वारकरी सांप्रदायाने एकमताने घेतला आहे. प्रस्ताव ठेवल्यानंतर दशमीला पादुका थेट पंढरपूरात न्यायच्या आहेत. त्या वाहनाने की हेलिकॉप्ट किंवा विमानाने घेऊन जायच्या याचा निर्णय शासन घेईल. शासनाच्या निर्णयाचे वारकरी सांप्रदायातून स्वागत होईल.” – ऍड. विकास ढगे-पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त

आपली प्रतिक्रिया द्या