गोपाळकाला साजरा करुन, पालख्या परतीच्या मार्गावर

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

तुझिया नामाचा विसर न पडावा … ध्यानीं तो रहावा पांडुरंग … संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनोमन आळवीत आषाढीच्या सोहळ्यासाठी जमलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीचा निरोप घेण्यास सुरुवात केली.

गोपाळपूर येथील गोपालकृष्ण मंदिरामध्ये भल्या पहाटे संपन्न झालेल्या गोपाळकाल्याला प्रमुख संतांच्या पालख्यासह हजारो वारकऱ्यांनी हजेरी लावली. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ असा अभंग गात वारकऱ्यांनी एकमेकांना दहीलाह्याचा प्रसाद दिला आणि घराच्या ओढीने परतीच्या मार्गाला लागले.