विठ्ठलाचे द्वारी, वैष्णवांचा मेळा

प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

विठ्ठलनामाचा गजर करीत देहू – आळंदीहून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पंढरीत येत आहेत. निवृत्ती ते निळोबा या संतपरंपरेतील बहुतेक संतांच्या पालख्या दरवर्षी आपापल्या समाधीस्थानापासून निघून एकमेकांना भेटत  भक्त मंडळींच्या विराट मेळाव्यात सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीची त्रिमिती म्हणजे विठ्ठल – वारी – वैष्णव ही असून मजलदरमजल पायी चालत वारकरी आंतरिक ओढीने दर्शन सोहळय़ाचे सुख घेण्यास आतुर झाले असून ‘देव पाहता, देवचि झालो’ या न्यायाने कृतार्थ होऊन राहणाऱ्यांचा भाग्यक्षण जवळ आला आहे.

‘मुखी नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची।।’ असे तुकोबाराय यांनी अभंगात म्हटले आहे, तर ‘देवाचिये द्वारी । उभा क्षण भरी । तेणे मुक्ती चारी । साधियेल्या ।।’ असे ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटले आहे. या दोन्हींची अंतमेळ पंढरीच्या वारीत अखंडपणे पायी चालत राहणे आणि मुखाने विठ्ठलनाम उच्चारीत राहणे यांच्याशी आहे, असा विचार मनात येऊन जातो. कसा म्हणाल? तर यातील अर्थसलगता ही पाहू जाता असे लक्षात येते की, मुखी नामस्मरण निघालेले वारकरी हे आपल्या ठायीच मोक्ष असल्याचे अनुभवत पंढरीत येतात. ही पंढरी त्यांचे मोक्ष ठिकाण आहे. ते ठिकाण त्यांच्या मनातही आहे. डोळय़ास दर्शनाचा आनंद, तर मनात विठ्ठल भेटीचा लागलेला वेध याद्वारे हे वारकरी ‘देवाचिये द्वारी’ येतात. तेथे पोहल्यावर प्राप्त होणारे विठ्ठल दर्शन त्यांना तक्षणीच चारही मुक्तीचे ‘अनुभव – सुख’ देऊन जाते. कारण मुक्तिसुख म्हणजे होणारा ‘अपार आनंद’ होय. मुक्ती हे ठिकाण नाही, तर ती भावस्थिती आहे. तिची प्राप्ती हेच महापुण्य होय. वारीत मनाने आणि शरीराने चालत येणारा वारकरी हा त्या भावस्थितीचा ‘मोक्षाधिकारी’ आहे असेच म्हणता येईल! ऐसी साक्ष बहुतांची म्हणजेच वारीत सहभागी झालेले लाखो वैष्णवजन होत. ही साक्ष केव्हापासून? तर वारी सुरू झाल्यापासून म्हणजे गेली कित्येक वर्षे आणि प्रतिवर्षी दिली जात आहे. हा विठ्ठल दर्शनाचा ‘अनुपम्य सोहळा’ पाहण्यास आता केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱयातून लोक येत आहेत. इतकेच नव्हे तर ‘विठ्ठलाचे माहात्म्य’ आणि ‘वारीतील भक्ती वैभव’ जाणून घेण्यासाठी परदेशातूनही लोक येऊ लागले आहेत. विश्वात्मदेवाची ही वैश्विकता जगाला आध्यात्मिक जीवनाची ओळख करून देत आहे, हे मात्र नक्की!

विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीत सामील होणाऱ्यांचा ‘वैष्णवांचा धर्म’ कोणता तर तेही ‘विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ!!’ या तुकाराम महाराजांच्या अभंगातून सांगितला गेला आहे. त्यायोगे काय सामाजिक बदल होईल तर ज्ञानदेवांनी त्यांची कार्यदिशा ‘आनंदाचे आवारू । मांडू जगी ।।’ अशा शब्दांत प्रकट केली आहे. मनाशी त्याचाही एक अंतर्मेळ जुळून येतो. कसे म्हणाल तर तुकोबाराय सांगतात की, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’. म्हणजे हे सर्व जग ईश्वराने व्यापलेले असून यातील प्रत्येक जीव हा त्याच्या चैतन्याचाच अंश आहे ही दृष्टी ठेवून जगाकडे पाहणे हा वैष्णवांचा धर्म आहे. त्यामुळे त्यांनी परस्परांशी समता व बंधुता या नात्याने वागावे. भेदभावाने न वागता प्रेमाने वागावे. भेदाभेद पाळणे हेच मुळी अमंगळ होय. त्याने कटुता वाढते, कलह माजतात, मग सामाजिकता एकोप्याने कशी नांदणार, जीवनस्वास्थ्य कसे टिकणार, तसे होऊ नये यासाठी ‘लहान कोण थोर कोण । कुणी घ्यावे पारखून । उच्च नीच नुरले काही । पांडुरंग सकला ठायी ।।’ अशा भावनेने वागावे. त्यातच सामाजिक हित, कल्याण आहे. तसेच तुकोबाराय पुढे सांगतात की, ‘हे भक्तांनो, तुम्ही भागवत ऐका. याचे दोन अर्थ संभवतात. पहिला म्हणजे तुम्ही एकनाथांचा भागवत ग्रंथ वाचून त्यातील भक्तितत्त्व जाणून घ्या. दुसरा अर्थ म्हणजे भागवत धर्मातील सर्वच संतांचे भक्तिवचन जाणून घ्या! कारण ‘निवृत्ती ते निळोबा’ या संतपरंपरेलाही भागवत धर्मीय संतच म्हटले जाते. व्यापक अर्थाने सांगायचे तर ‘अध्यात्मविद्या’ जाणून तिचे अनुसरण करा. त्यातच तुमचे – आमचे हित आहे.

आध्यात्मिकतेतून सामाजिक हित, कल्याण करणे हाच वैष्णव धर्म असल्याने विठ्ठलचरणी विनम्र होऊन त्याच्या कृपाशीर्वादाने जीवनाची वाटचाल करणारी वारकरी मंडळी वारीच्या माध्यमातून संतांच्याच उपदेशाचा प्रसार नि प्रचार करीत आहेत. म्हणून विठ्ठलाची वारी हाही वारीक्रतस्वरूपी धर्मच होय. तो वर्षानुवर्षे आणि पिढय़ान्पिढय़ा सुरू आहे.

ज्ञानदेव-तुकोबाराय यांच्या ओवी नि अभंग यांद्वारे विठ्ठलद्वारी जमणारा वैष्णवांचा मेळा किती वैशिष्टय़पूर्ण आहे हे पाहताना आणखी एक गोष्ट ध्यानात येते ती अशी की, नामदेव महाराजांच्या प्रभावळीतले अठरापगड संत हेही वारी धर्माचे तर पालन करीत होतेच, पण त्याचबरोबर ते कर्मसन्मुख भक्तिमार्ग अनुसरून त्याचाच प्रचार करीत होते. चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार, सेना महाराज आदी मंडळी आपापली कामे करीत होतीच. शिवाय त्यांनीही अभंग लिहिले आणि समाज प्रबोधन केले. विहित कर्मे करीत करीतच ते जीवन जगले. विठ्ठलनाम त्यांच्या मुखी होते. त्यांना कष्ट झाले, पण ते जाणवले नाहीत. कारण ते देवद्वारी नामच होत होते. आनंदरूपी मोक्ष त्यांनाही प्राप्त झाला. विठ्ठल – वारी – वैष्णव हा त्रिवेणी संगम असून त्यायोगेच आत्मकल्याण व विश्वकल्याण होऊ शकेल. संत मंडळींनी हेच बहुथोर कार्य केले आहे.